मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी शिफारस करणारा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आला. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी हा शासकीय ठराव मांडला होता.

मराठी भाषा ही अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने केंद्राने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे या ठरावावर बोलताना अनेक सदस्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्यात यावे आणि या मागणीच्या पाठपुराव्यासाठी एक समिती नेमण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. या सूचनांचे स्वागत करून राज्य शासन यावर निश्चित कृती करेल. असे देसाई यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी भाषा असल्याचे सिद्ध झाले आहे. पुरातन मराठी, मध्यकालीन मराठी व आजची मराठी एकच असल्याचेही सिद्ध झाले आहे. १९२७ साली श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मराठीचे वय २५०० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दाखवून दिले आहे. मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्ये दाखवून दिले आहे. प्रा. रंगनाथ पठारे समितीने ही भाषा अभिजात भाषेच्या दर्जासाठी पात्र असल्याचा पुराव्यानिशी निर्वाळा दिला आहे. तरीही या भाषेला हा दर्जा मिळत नसल्याबाबत मराठी भाषिकांच्या मनात शल्य आहे. तेव्हा केंद्र शासनाने विनाविलंब याबाबतीत निर्णय घ्यावा.

सर्वपक्षीय सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला व एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. आशिष शेलार, राहुल नार्वेकर, रवींद्र वायकर, रमेश कोरगांवकर आदींनी ठरावावर आपली मते मांडली.

विधान परिषद, विधानसभेची शिफारस

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी १९२७ साली मराठीचे वय २५०० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दाखवून दिले आहे. मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्ये दाखवून दिले आहे. प्रा. रंगनाथ पठारे समितीने ही भाषा अभिजात भाषेच्या दर्जासाठी पात्र असल्याचा पुराव्यानिशी निर्वाळा दिला आहे.  तेव्हा केंद्र शासनाने विनाविलंब याबाबतीत निर्णय घ्यावा.