उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी कृती योजना

मुंबई : मध्य रेल्वेवरील गाडय़ांचे बिघडलेले वेळापत्रक सुधारण्याकरिता मध्य रेल्वेने कृती योजना आखली आहे. यानुसार काही ठिकाणी लोकल गाडय़ांसाठीची वेग मर्यादा काढण्याबरोबरच, पाचवा-सहावा मार्गावरून जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा वेग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचा वक्तशीरपणा पूर्ववत होईल, अशी आशा रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र त्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे.

सिग्नल, ओव्हरहेड आणि लोकल गाडय़ांमध्ये बिघाड, रुळाला तडा, रेल्वे फाटक खुले राहणे इत्यादी कारणांमुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होत असते.  सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यात रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक सुधारण्याचे प्रयत्न होत नाहीत. गेल्या शुक्रवारी संसदेत भाजप खासदार मनोज कोटक यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी मध्य रेल्वेला खडसावले व गाडय़ांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी कृती योजना तायर करण्यास सांगितले.

ठाणे ते दिवा आणि सीएसएमटी ते कुल्र्यापर्यंत मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी पाचवा-सहावा मार्ग नाही. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या मार्गाचा वापर केला जातो. परिणामी जलद गाडय़ांचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे मुंबईतून मेल-एक्सप्रेस गाडय़ांना झटपट बाहेर काढण्यासाठी त्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रतितास ८० ते ९० किमी वेग असतानाच त्यांना प्रतितास १०५ या वेगाने मेल-एक्स्प्रेस चालवण्याची परवानगी दिली जाईल. मुंबईत प्रवेश करणाऱ्या गाडय़ांनाही हाच नियम केला जाणार आहे. त्यामुळे जिथे पाचवा-सहावा मार्ग नाही, तेथून या गाडय़ा झटपट जातील व लोकलचाही मार्ग सुकर होईल.

वेगमर्यादेची समस्या सोडवणार

काही ठिकाणी लोकल गाडय़ांसाठी कायमस्वरुपी वेगमर्यादा आखून दिलेली आहे. रुळ व ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक समस्येमुळे ही वेगमर्यादा गेली ५० वर्ष तरी कायम ठेवलेली होती. अशा विक्रोळी, ठाणे, डोंबिवली व कल्याण येथील लोकल गाडय़ांसाठी प्रतितास ३० ते ६० पर्यंत असलेली वेगमर्यादा काढली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक समस्या सोडवण्यात येईल. त्यामुळे लोकल गाडय़ा सुरळीत धावू शकतील. या दोन महत्त्वाच्या नियोजनासह अन्य तांत्रिक समस्यांची अंमलबजावणी करण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे आणि त्यानंतरच वेळापत्रक सुधारणार आहे.

आणखी काय उपयायोजना

* सिग्नल, ओव्हरहेड वायर, लोकलमधील बिघाड वारंवार होत असल्याने देखभाल-दुरुस्तीचे काम अधिक लक्ष देवून करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

* सध्या मध्य रेल्वे स्थानकांत लोकल गाडय़ांच्या वेळेची उद्घोषणा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रवाशांचा बराच गोंधळ उडतो. यात उद्धोषणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यातून वरिष्ठ अधिकारी भेट देतील व आढावा घेतील. तांत्रिक समस्या असल्यास त्या सोडवल्या जातील. याचप्रमाणे उद्धोषणा कर्मचाऱ्यांतही उद्धोषणा करण्याच्या कामांत सुधारणा करण्याचा प्रयत्न होणार आहे.