मुंबई लोकलमध्ये होणारे वाद काही मुंबईकरांना नवे नाहीत. फक्त पुरुषांच्या डब्यातच नाहीत तर महिला डब्यातही वाद होतात. मात्र आता फर्स्ट क्लासमध्ये बसल्याच्या वादावरून रेल्वे कर्मचारी महिलेने, महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. प्रियंका मोरे असं या महिलेचे नाव आहे. ही महिला मध्य रेल्वेची कर्मचारी आहे. तिला यासाठी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी प्रियंका मोरे आणि कॉन्स्टेबल वर्षा गायकवाड यांच्यात वाद झाला. वडाळा येथून सीएसएटीकडे सुटणारी ट्रेन वर्षा गायकवाड यांनी कुर्ल्याहून पकडली. त्यादिवशी चुनाभट्टी या ठिकाणी त्यांची ड्युटी होती.

वर्षा गायकवाड या महिला प्रथमवर्गाच्या डब्यात शिरल्या. त्या डब्यात येताच प्रियंका मोरेंनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. तुम्ही गणवेशात असताना फर्स्ट क्लासने प्रवास कसा काय करू शकता? असा प्रश्न विचारून वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर इतर प्रवाशांनाही मोरे यांनी तुम्ही काही बोलत का नाही? असे प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. ज्यानंतर वर्षा गायकवाड यांनी प्रियंका मोरेंना पोलीस स्टेशनला चला असे म्हटले.

लोकल जेव्हा जीटीबी नगरला आली तेव्हा वर्षा गायकवाड या प्रियंका मोरे यांना उतरण्यास सांगत पोलीस स्टेशनला चला असे म्हणू लागल्या त्यावेळी त्यांनी नकार दिला. वर्षा गायकवाड यांनी प्रियंका मोरेंना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी वर्षा यांच्या हाताला चावा घेतला. मंगळवारी सकाळी हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. प्रियंका मोरे यांना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. मिड-डे ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.