मध्य रेल्वेचे नियोजन ढेपाळल्याने सेवा लांबणीवर

हार्बर रेल्वेचा गोरेगावपर्यंत विस्तार करतानाच पुढील महिनाभरात गोरेगाव-पनवेल हार्बर सेवा सुरू करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन ढेपाळले असून या मार्गावरील प्रवाशांना आता थेट पावसाळ्यानंतरच या मार्गावर प्रवास करता येणार आहे. पावसाळ्यानंतरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हार्बर रेल्वे अनेक वर्षे सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते अंधेरी सेवेपर्यंतच मर्यादित होती. एमयूटीपी-२ योजनेअंतर्गत अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात आले. या कामाला २००९ साली सुरुवात करण्यात आली. मात्र ते रडतखडतच सुरू होते. अनंत अडचणीनंतर हे काम डिसेंबर, २०१७ ला पूर्ण झाले. त्यामुळे सुरुवातीला ८८ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असलेल्या या प्रकल्पाचा खर्च थेट २१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

अखेर मार्च- २०१८ मध्ये गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार झाला. या मार्गावर ४९ फेऱ्या चालवल्या जातात. यात सीएसएमटी ते अंधेरीपर्यंतच्या फेऱ्यांचाही समावेश आहे. हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार केल्यानंतर महिनाभरातच म्हणजे मे-जूनपर्यंत गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानही सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. सध्या पनवेल ते अंधेरी दरम्यान १८ फेऱ्या आहेत. त्या गोरेगावपर्यंत वाढल्या असत्या. परंतु हे काम लांबले आहे. आता पावसाळ्यानंतरच ही सेवा सुरू करू, असे रेल्वे म्हणते आहे. हार्बर सेवा पनवेलपासून गोरेगावपर्यंत लांबली की अंधेरी स्थानकावरील प्रवाशांचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचा हिरमोड होणार आहे. आधीच गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान सकाळच्या वेळेस पुरेशा फेऱ्या नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यात हे पनवेलपर्यंतचा विस्तार लांबला आहे.

अंधेरी ते सीएसएमटी आणि अंधेरी ते पनवेल या दरम्यानच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात गोरेगाव-सीएसएमटीचा समावेश करावा लागेल. तो करताना रेल्वेची बरीच धांदल उडते आहे. गोरेगावपर्यंत फेऱ्या वाढवल्यास सध्याच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हे पाहता त्याची कोणतेही वेळापत्रक विस्कळीत न होता गोरेगाव ते पनवेल लोकल फेऱ्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे आणि त्यावर कामही सुरू आहे. त्यामुळेच गोरेगाव-पनवेल लोकल सेवा पावसाळ्यानंतर चालवण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गोरेगाव-पनवेल-गोरेगाव लोकल सेवा पावसाळ्यानंतर चालवण्यात येईल. सध्या या मार्गासाठीच्या वेळापत्रकावर काम सुरू आहे. परंतु प्राधान्य सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत धावत असलेल्या फेऱ्यांचे योग्य नियोजन करण्याला आहे. ते मार्गी लागले की गोरेगाव-पनवेलचा विचार केला जाईल.   – एस. जैन, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे