मध्य रेल्वेचा ऐनवेळी वेळापत्रक बदल

बकरी ईदची सुट्टी आणि मुंबईतील दहा दिवसांचे गणपती यांमुळे मंगळवारी कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्य रेल्वेवरील ‘रविवारच्या वेळापत्रका’चा फटका बसला. सार्वजनिक सुटीच्या दिवशी मध्य रेल्वेवर रविवारइतक्याच सेवा चालवल्या जातात. त्यामुळे अनेक सेवा रद्द असल्याने मध्य रेल्वेवरील गर्दीचा भार वाढतो. मंगळवारीही हाच प्रकार घडल्याने प्रवाशांचे कमालीचे हाल झाले.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉकच्या दिवशी बहुतांश सेवा रद्द असतात. त्यामुळे दर रविवारी या ‘रविवार वेळापत्रका’नुसार हाल सहन करत प्रवासी प्रवास करतात. हेच रविवारचे वेळापत्रक सार्वजनिक सुटय़ांच्या दिवशी मध्य रेल्वेतर्फे लागू करून देखभाल-दुरुस्तीसाठी जादा वेळ घेतला जातो. त्यानुसार मंगळवारी बकरी ईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुटी असल्याने मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू केले होते. ‘रविवार वेळापत्रका’त मध्य रेल्वेवर चालणाऱ्या १६१८ सेवांपैकी ३६० सेवा रद्द केल्या जातात.

रविवारच्या मेगा ब्लॉकच्या आधी मध्य रेल्वे प्रवाशांना वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देऊन ब्लॉकबाबत माहिती देते. त्यामुळे प्रवासीही तयारीने बाहेर पडतात. मात्र, मंगळवारच्या ब्लॉकदरम्यान रेल्वे प्रशासनाने कोणतीही आगाऊ सूचना दिली नाही. त्यामुळे स्थानकात आल्यानंतर अनेक सेवा रद्द झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. एकामागोमाग दोन-तीन सेवा रद्द झाल्याने १५-१५ मिनिटे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे राहावे लागत होते. त्यातच मागून येणाऱ्या गाडीतही गर्दी असल्याने चेंगराचेंगरी होत होती.

सुट्टीच्या दिवशी लहान मुले, बायका अशा कुटुंबकबिल्यासह बाहेर पडलेल्या प्रवाशांना या रविवारच्या वेळापत्रकाचा फटका बसला. मध्य रेल्वेने मुळात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ब्लॉक किंवा रविवारचे वेळापत्रक लागू करता कामा नये. लोक आपल्या कुटुंबासह बाहेर पडतात त्या दिवशीही गाडय़ांचा गोंधळ असेल, तर आबालवृद्धांचे हाल होतात. सुट्टीच्या दिवशी गर्दी कमी असते, हा मध्य रेल्वेचा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे येथील संतप्त प्रवासी नरेश भडसावळे यांनी दिली.

सार्वजनिक सुटीच्या दिवशी कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू करू नये, हे आम्ही मध्य रेल्वे प्रशासनाच्या कानावर अनेकदा घातले आहे. पण तरीही मध्य रेल्वेतर्फे हा प्रकार नेहमीच केला जातो. ब्लॉक घेण्याबद्दल किंवा रविवारचे वेळापत्रक लागू करण्याबद्दल आक्षेप नाही. पण त्याची सूचना प्रवाशांना एक दिवस आधी द्यायला हवी.

-नंदकुमार देशमुख, उपनगरीय प्रवासी एकता संघ