दरवर्षी पावसाळ्यात किमान ३-४ वेळा बंद पडणारी मध्य रेल्वे गुरुवार संध्याकाळचा अपवाद वगळता यंदा मुसळधार पावसातही व्यवस्थित आणि सुरळीत सुरू होती. मध्य रेल्वेच्या सर्वच विभागांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीला याचे श्रेय जात असून यामुळे मध्य रेल्वे यंदाच्या खडतर मान्सून परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. जुलैच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने कुर्ला आणि भांडुप येथे मध्य रेल्वेला कोंडीत पकडले होते. मात्र पूर्वतयारी परीक्षेत काठावर उत्तीर्ण होणाऱ्या मध्य रेल्वेने त्यानंतर आणखी ‘अभ्यास’ करत गेले पाच दिवस पडणाऱ्या पावसाला उत्तमरित्या तोंड दिले. गुरुवारी संध्याकाळी मस्जिद आणि भायखळादरम्यान पाणी भरले, तरी गाडय़ा सुरू होत्या. यासाठी मध्य रेल्वेने गेल्या वर्षभरात ५५ ते ६० कोटी रुपयांचा खर्च केवळ सिग्नल यंत्रणेवर केला आहे. गेल्या वर्षभरात ५० कोटी रुपये खर्च करून डिजिटल अ‍ॅक्सेल काउंटर्स बसवले. तसेच पाच कोटी रुपये खर्च करून एलईडी सिग्नल बसविले. त्याचा फायदा यंदाच्या पावसाळ्यात मोटरमन आणि गार्ड यांना झाला आहे.  त्याशिवाय मध्य रेल्वेने रोज रेल्वेमार्गालगतचा कचराही साफ करण्यास सुरुवात केली आहे. दर दिवशी दीड ते दोन हजार गोणी कचरा एकत्र केला जातो. परिणामी रेल्वेमार्ग स्वच्छ राहून पाणी साचत नाही.