पश्चिम रेल्वेमार्गावरून अडीच हजार किलो प्लास्टिक गोळा; स्वच्छता मोहिमेला प्रवाशांकडून हरताळ

रुळालगतच्या वाढत्या वस्त्या, स्थानक किंवा प्रवासात कचरा खिडकीतून बाहेर भिरकावणारे निष्काळजी प्रवासी आदी कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला विशेष ‘स्वच्छता मोहिमां’तून साद देऊनही रेल्वेचा कचऱ्याचा भार कायम आहे. पश्चिम व मध्य रेल्वेने नुकतेच १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छता अभियान राबवले. या वेळी मध्य रेल्वेमार्गावर तब्बल १२ टन कचरा आढळून आला. यात उपनगरीय रेल्वेवरील ९ टन कचऱ्याचा समावेश होता. तर पश्चिम रेल्वेवरही मुंबई विभागात आढळलेल्या कचऱ्यात २ हजार ३१३ किलो प्लास्टिक जमा झाल्याची माहिती देण्यात आली.

दर वर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वेकडून विशेष मोहीम हाती घेऊन नालेसफाई व रुळांलगतचा कचरा काढला जातो. या वेळी पश्चिम व मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष गाडी चालवून रुळांवरील कचरा गोण्यांमध्ये गोळा केला जातो. मात्र पुन्हा तितकाच कचरा रुळांवर जमा होतो. त्यामुळे रुळांना धोका पोहोचतो. रुळांचे आयुर्मान कमी होते. रूळ बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही. पावसाळ्यातही मोठय़ा प्रमाणात रुळांवर पाणी साचते. कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि रुळांवर पाणी साचते.

यंदा मध्य व पश्चिम रेल्वेने गांधी जयंतीनिमित्त १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबपर्यंत सफाई अभियान चालवले आणि यात त्यांना रुळांलगतच मोठय़ा प्रमाणात कचरा सापडला. परंतु हे अभियान संपत असतानाच, २ ऑक्टोबरला माहीम स्थानकाजवळ कचरा लोकलच्या चाकांमध्ये अडकल्याने लोकल रुळावरून घसरली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी माहीमजवळ घडलेल्या घटनेनंतर रुळांजवळील झोपडय़ांमधून टाकला जाणारा कचऱ्याला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

प्लास्टिकचा धोका

  •  पश्चिम रेल्वेने चालवलेल्या सफाई अभियानात मुंबई, उधना, जळगाव, सुरतपर्यंत १०९ टन कचरा काढण्यात आला. यात २ हजार ३१३ किलो प्लास्टिकचा समावेश आहे.
  • मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, सोलापूर या मुंबई विभागात एकूण १२ टन कचरा आढळल्याचे सांगितले. मात्र यातील ९ टन कचरा हा एकटय़ा मुंबई उपनगरीय मार्गावरीलच होता. यातही प्लास्टिकचे प्रमाण अधिक होते.

पश्चिम रेल्वेची कारवाई

कचरा करणे, थुंकणे याविरोधात पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबपर्यंत केलेल्या कारवाईत २ हजार ७६८ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ९५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

 धोके काय?

  • कचऱ्यामुळे रुळांची झीज होऊ शकते.
  •  दरुगधी व आरोग्याचा प्रश्न
  • लोकल गाडय़ांच्या चाकात कचरा अडकून दुर्घटनेची शक्यता