मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दादरहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफमध्ये ठाण्याजवळ बिघाड झाला. त्यामुळे ही लोकल ठाणे रेल्वेस्थानकात थांबवण्यात आली. या लोकल खोळंब्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. दरम्यान, बिघाड झालेली लोकल हटवण्यात आली अाहे. मात्र, वाहतूक उशिराने सुरू आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची मालिका सुरूच आहे. काल मुंब्रा-दिवादरम्यान धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे चाकरमान्यांना कामावरून घरी परतताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारीही सायंकाळी रेल्वे रूळांना तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. कल्याणकडे जाणारी वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली होती. ठाणे- दिवादरम्यान मध्य मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली होती. या घटनेनंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवल्यामुळे कल्याण, ठाणे येथील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र कळवा, मुंब्रा या ठिकाणी जलद गाड्या थांबत नसल्याने येथील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. काल सकाळीही याच मार्गावर रुळाला तडे गेल्याने काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल खोळंब्यामुळे रेल्वे प्रवाशांना होणारा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजही संध्याकाळच्या सुमारास दादरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल ठाणे रेल्वे स्थानकातच थांबवावी लागली आहे. लोकल खोळंब्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून,
लोकलगाड्या थोड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे पुन्हा हाल झाले आहेत. रेल्वेच्या या कारभाराबाबत प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रशासन तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेत आहे. मात्र, रुळाला तडा जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटाग्राफमध्ये बिघाड, सिग्नल बिघाड हा रोजचाच प्रकार झाला आहे. मेगा ब्लॉक घेऊनही लोकल खोळंब्याचे सत्र काही केल्या थांबत नाही. रेल्वेप्रवाशांना होणारा त्रास कधी थांबेल, असा प्रश्न आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.