प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची योजना
वाढत्या प्रवासी संख्येवर अल्प मुदतीत उतारा म्हणून मध्य रेल्वेने आपल्या नव्या वेळापत्रकात ४१ नव्या फेऱ्यांबरोबरच असलेल्या फेऱ्यांपैकी काहींची गंतव्य स्थाने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या फक्त कुर्ला, ठाणे, कल्याण, नेरुळ, बेलापूर, वाशी स्थानकापर्यंत धावणाऱ्या फेऱ्या त्यापुढे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना सध्या अस्तित्वात असलेल्या फेऱ्यांचा जास्त फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर २२, हार्बर मार्गावर सात आणि मुख्य मार्गावर १२ फेऱ्या वाढवण्याचे नियोजन नव्या वेळापत्रकात केले आहे. या नव्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जाते. मात्र एवढय़ावरच न थांबता मध्य रेल्वेने सध्याच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तीनही मार्गावर काही गाडय़ा कुर्ला, वडाळा, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नेरुळ, बेलापूर या स्थानकांपर्यंतच धावतात. त्यामुळे पनवेल, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत या स्थानकांपर्यंत प्रवास करणाऱ्यांना काहीच फायदा होत नाही. ही अडचण लक्षात घेत मध्य रेल्वेने नव्या वेळापत्रकात मुख्य मार्गावर २ गाडय़ांचे, हार्बर मार्गावर ८ गाडय़ांचे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सहा गाडय़ांचे गंतव्य स्थान बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पनवेलपासून वडाळ्याला येणाऱ्या गाडय़ा थेट सीएसटीपर्यंत, तर सीएसटीहून किंवा ठाण्याहून वाशी, नेरुळपर्यंत जाणाऱ्या लोकल पनवेलपर्यंत नेण्यात येतील. या गाडय़ांची गंतव्य स्थाने बदलताना गर्दीचा विचार करण्यात आला असल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

फेऱ्यांचा विस्तार
०२ मध्य रेल्वे मुख्य मार्गावर
०८ हार्बर मार्गावर
०६ ट्रान्स हार्बर मार्गावर