चंद्रकांत पाटील यांचे भुजबळांना आव्हान

राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवरून चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ या आजी-माजी मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली. रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली असता ही सारी परिस्थिती आपल्या काळातच झाल्याचे प्रत्युत्तर पाटील यांनी देऊन खापर भुजबळांवर फोडले, तसेच आघाडी सरकारच्या काळातील रस्त्यांची अवस्था जाणून घेण्याकरिता संयुक्त दौरा करण्याची तयारी दर्शवून पाटील यांनी भुजबळ यांना आव्हानच दिले आहे.
युती सरकारला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक हजार रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम म्हणजे धूळफेक असल्याचे पत्र भुजबळ यांनी पाटील यांना पाठविले आहे. यातील बहुतांश कामांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून, अनेक आमदारांनी कामांची भूमिपूजने उरकली आहेत. मंजूर कामेच नव्याने दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळात तयार केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता सरकारकडे निधी नाही. दुरुस्ती वेळेत न झाल्यास रस्त्यांवर मोठाले खड्डे पडण्याची भीती भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
भुजबळ यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, राज्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय का झाली, असा सवाल केला आहे. रस्त्यांची ही अवस्था गेल्या वर्षभरातील नाही तर गेल्या १० ते १५ वर्षांतील आहे याकडे लक्ष वेधले आहे. आघाडी सरकारच्या काळात रस्त्यांच्या प्रति शासनाची असलेली अनास्था यातून स्पष्ट होते. तशी कबुलीच आपण दिली आहेत, असा टोला पाटील यांनी भुजबळ यांना उद्देशून लगावला आहे. या साऱ्यातून आपले ज्येष्ठत्व सिद्ध होते आणि अधिक काय बोलावे, असा सवाल केला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आपण दोघेही राज्यात तुम्ही सांगाल तेथे फिरू आणि २००० ते २०१४ या काळात रस्त्यांची अवस्था काय होती व २०१४ नंतरचे चित्र हे जाणून घेऊ या, असे आव्हानच पाटील यांनी भुजबळ यांना दिले आहे. पाटील यांच्या पत्राचा एकूण सूर बघता ‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था भुजबळांची झाली आहे.