माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहून कोणतेही कामकाज न करता स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यास नकार देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करीत विरोधी पक्षाने शुक्रवारी सभात्याग केला.
मोठय़ा नेत्याचे निधन झाल्यानंतर स्थायी समिती अथवा अन्य समितीमध्ये त्यास श्रद्धांजली वाहून बैठक तहकूब करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहून बैठक तहकूब करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. मात्र बैठकीचे कामकाज संपल्यानंतर शोक प्रस्ताव मांडून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्पष्ट केले. आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री होती. त्यामुळे बैठक सुरू झाल्यानंतर तात्काळ शोक प्रस्ताव मांडावा आणि बैठक तहकूब करावी, अशी मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र यशोधर फणसे यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
आर. आर. पाटील यांना विधी समितीच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर बैठक तहकूब झाली. मग स्थायी समितीमध्ये कामकाज झाल्यानंतर शोक प्रस्ताव का घेण्यात येत आहे. सुरुवातीलाच शोक प्रस्ताव मांडून बैठक तहकूब का करण्यात येत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केला. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनीही त्यास पाठिंबा दिला. यशोधर फणसे आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.