मुंबई : ऑनलाइन साडी खरेदीच्या तयारीत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवानाची सायबर भामटय़ांनी सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नामांकित कंपनीच्या संकेतस्थळावरून ९ हजार रुपयांची साडी खरेदी करण्याच्या बेतात असताना हा जवान भामटय़ांच्या जाळ्यात सापडला.

सीआयएसएफमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने ९ मे रोजी वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून पत्नीसाठी दोन साडय़ांची मागणी नोंदविली होती. मात्र १३ मेपर्यंत साडय़ा न मिळाल्याने त्यांनी विचारणा करण्यासाठी ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळाशी संपर्क साधला. या वेळी समोरून बोलणाऱ्या कर्मचाऱ्याने एका दिवसात साडय़ा घरपोच मिळतील, असे जवानाला सांगितले. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने खरेदीदार व्यक्तीने कुरिअर घरपोच पोहोचविणाऱ्या ई-कार्ट लॉजिस्टिक या कंपनीचा क्रमांक गूगलवरून मिळविला. तसेच त्या क्रमांकावर संपर्क साधला. घराचा पत्ता चुकीचा असल्याने कुरिअर अडकल्याची माहिती समोर बोलणाऱ्याने या जवानाला दिली. तसेच एक अर्ज भरून देण्यास सांगितले. समोर बोलणाऱ्या भामटय़ाने अर्जात तांत्रिक अडचणी येत असल्याचा बनाव रचून या जवानाला मोबाइलमध्ये ‘टीम व्ह्य़ूअर’ ही प्रणाली सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर भामटय़ाने ५० हजार, ४९ हजार आणि २४ हजार ९९९ रुपयांचे तीन व्यवहार करून या खरेदीदार जवानाच्या खात्यातून १ लाख २४ हजार रुपये परस्पर वळते केले. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.