लोकांना ठकविण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने चक्क ‘जस्ट डायल’ कंपनीचा वापर केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या ठकसेनाने जस्ट डायल कंपनीत मेकॅनिक म्हणून चार वेगेवगळ्या नावांनी नोंदणी केली होती. एका नौदल अधिकाऱ्यास त्याने मेकॅनिक म्हणून ठकविले होते. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने या ठकसेनास अटक
केली आहे.
मे महिन्यात एका नौदल अधिकाऱ्याची सॅण्ट्रो गाडी मुक्त मार्गावर (फ्री वे) बंद पडली होती. त्याने जस्ट डायल या कंपनीला फोन करून टोइंग आणि मेकॅनिकसंदर्भात विचारणा केली होती. त्या वेळी समीर नावाच्या मेकॅनिकने या अधिकाऱ्यास फोन केला. या ठकसेनाने या अधिकाऱ्याची गाडी टोइंग करून वांद्रे येथील एका गॅरेजमध्ये नेत असल्याचे सांगितले. या गाडीच्या दुरुस्तीसाठी समीरने ३० हजार रुपये घेतले होते.
आपली गाडी दुरुस्त होऊन येईल याची वाट हा अधिकारी बघत होता. मात्र ती न आल्याने या अधिकाऱ्याने वांद्रे येथील अँथोनी गॅरेजमध्ये जाऊन चौकशी केली असता अशी गाडी आली नसल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून सातांक्रूझ येथील झुबेर खान (२७) या ठकसेनास अटक केली. त्याने धारावी येथे अशाच प्रकारे एकाची पजेरो ही महागडी गाडी पळवली होती.