तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला
महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या अटकेत असलेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मनसुबे विशेष न्यायालयाने बुधवारी उधळून लावले. कुटुंबीयांसमवेत होळी साजरी करायची असल्याने त्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची भुजबळांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याने भुजबळांना यंदाची होळी-धुळवड आर्थर कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.

दोन दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत काढल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यामुळे भुजबळ सध्या आर्थर रोड कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित अशा ‘अंडासेल’ वास्तव्यास आहेत, परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करू द्यावा, या मागणीसाठी भुजबळांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. तसेच होळीच्या सणासाठी तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली होती. आपण ज्येष्ठ नागरिक असून एक सच्चा भारतीय या नात्याने गरीब, शेतकरी, अपंगांना सतत मदत केली आहे, असा दावा भुजबळ यांनी ताप्तुरत्या जामिनाची मागणी करताना केला होता.  सध्या ते राजकीय सूडाचा बळी ठरले आहेत, असा दावा त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

मात्र, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार असा जामीन देण्याची तरतूद नाही. त्यामुळे भुजबळांच्या जामीन अर्जाला अर्थ नाही, असा दावा ‘ईडी’चे वकील हितेन वेणेगावकर यांनी करत त्यांच्या जामिनाला विरोध केला. न्यायालयानेही ‘ईडी’चा हा युक्तिवाद मान्य करत भुजबळांच्या कुटुंबीयासोबत होळीचा सण साजरा करण्याच्या इच्छेवर पाणी फेरले.