करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा संपूर्ण देशभरात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी गणेशोत्सवावर या विषाणूचं सावट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि इतर शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. यामध्ये मूर्तीची उंची ४ फुटापेक्षा जास्त असू नये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसेच प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा मिरवणूक सोहळाही रद्द करण्याचं ठरलंय. राज्य सरकारच्या या आवाहनला प्रतिसाद देत मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळाने यंदा मोठी मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक परंपरा कायम राखून यंदा मंडळाच्या देव्हाऱ्यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं हे १०१ वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी मुंबई आणि राज्यातून अनेक भक्तगण चिंचपोकळीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने देशात प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. तसेच परंपरा कायम राखत सरकारच्या सर्व नियमांचं पालन करुन हा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिताराम नाईक यांनी दिली.

सध्याचा खडतर काळ बघता यंदा चिंचपोकळीच्या मंडळाने, रक्तदान शिबीर, आरोग्य चिकीत्सा, रुग्णसाहित्य केंद्र, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी यंदा मंडळ कृत्रिम तलावाची सोय करुन देणार असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. करोना प्रादुर्भावाच्या काळात मंडळाने आपलं सामाजिक भान राखत मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत, आजुबाजूच्या परिसरात सॅनिटायजेशन असे उपक्रम राबवले होते.