मुलाखती रद्द; राज्य सरकारचा निर्णय

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेत नसलेली वर्ग दोन ते चतुर्थश्रेणीपर्यंतची सर्व पदे केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आलेला हा निर्णय आता सरकारच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महामंडळे, सार्वजनिक उपक्रमांनाही लागू करण्यात आला आहे.
नोकरभरतीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबरच पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी वर्ग तीन व चारच्या भरतीसाठी मौखिक परीक्षा रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये केली होती. त्यानुसार राज्य सरकारनेही वर्ग ‘ब’ आणि ‘क’ ची म्हणजेच अराजपत्रित पदे भरताना कोठेच तोंडी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

’भरती करताना ऑनलाइन अर्ज मागविले जातील. त्यानंतर लेखी परीक्षा घेऊन निकालही ऑनलाइन जाहीर केला जाईल.
’या लेखी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून त्यातून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
’चतुर्थश्रेणीतील पदे भरतानाची ७५ गुणांची लेखी परीक्षा आणि २५ गुणांची तोंडी परीक्षेची पद्धतीही रद्द
’वाहनचालकासारखी तांत्रिक पदे भरतानाही लेखी परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून एक जागेसाठी चार या प्रमाणात उमेदवार निवडून त्यांची चाचणी घ्यावी. तसेच यापुढे कोणतीही भरती करताना तोंडी परीक्षा घेऊ नयेत, असेही या आदेशात म्हटले आहे.