04 March 2021

News Flash

सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ‘गाळातच’

पावसाळ्यात मुंबईत पाणी साठू नये यासाठी गेले दीड महिना विविध भागात नालेसफाई सुरू आहे.

मुंबईच्या नालेसफाईवरून राजकारण रंगलेले असतानाच मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य़ व्हावा यासाठी दररोज या नाल्यांमध्ये मानेपर्यंत उतरून त्यातली हजारो मेट्रिक टन गाळ हातांनी उपसणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पावसाळ्यात मुंबईत पाणी साठू नये यासाठी गेले दीड महिना विविध भागात नालेसफाई सुरू आहे. नाल्यातून निघणाऱ्या गाळाच्या हजारो मेट्रीक टनांच्या आकडय़ांच्या जंजाळात प्रशासन आणि सामान्य नागरिकही गुंतले आहेत. मुंबईत सुमारे साडेतीन लाख मीटर लांबीचे लहान आणि मोठे नाले आहेत. या नाल्यातून दरवर्षी साधारण चार लाख घनमीटर टन गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जातो. मोठय़ा नाल्यातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. तर तीन वेळा निविदांना प्रतिसाद आला नसल्याने लहान नाल्यातील म्हणजे गटारांमधील गाळ काढण्यासाठी वॉर्ड पातळीवर विविध संस्थांकडून काम करून घेण्यात येत आहे. नाल्यातील गाळ काढण्यासाठी पोर्कलेन यंत्राचा वापर करण्यात येत असला तरी नाल्यांच्या दोन्ही बाजूंची झालेली अतिक्रमणे तसेच मोठय़ा गटारात पोर्कलेन यंत्र उतरवू शकत नसल्याने बहुतांश ठिकाणी कामगार हा गाळ हाताने उपसत आहेत.

घरातील सांडपाण्यापासून शौचालयातील घाणीपर्यंत सर्वच वाहिन्या नाल्यात सोडल्या जात असताना कोणत्याही संरक्षक साधनांशिवाय कामगार गाळात उतरून सफाई करताना दिसत आहेत. मालवणी येथे छातीपर्यंत उंच असलेल्या गटारात उतरलेल्या कामगार हाताने घमेल्यात गाळ भरून गटाराच्या कडेला उभ्या राहिलेल्या कामगाराला देत होता. हातमोजे सैल आहेत, ते घातले की पकड राहत नाही. पायालाही जखमा झाल्या तर पटकन कळत नाहीत, म्हणून गमबूट, हातमोजे घातले नाही, असे त्या कामगाराने सांगितले. मात्र नालेसफाईच्या राजकारणात गुंतलेले नगरसेवक व पालिका प्रशासनाला या कामगारांचा कळवळा आलेला नाही.

संरक्षक साधने नसल्याने पालिकेच्या सफाई कामगारांनाही आरोग्याच्या अनेक समस्या आल्या आहेत. पालिका प्रशासन तेथेही लक्ष देण्यास तयार नाहीत तर कंत्राट देऊन काम करून घेत असलेल्या कामगारांना कोण विचारणार अशा प्रश्न कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी उपस्थित केला. काही वेळा कामगारांना या साधनांची सवय नसल्याने तेदेखील गमबूट, हातमोजे वापरण्यास नकार देतात.

संरक्षक साधने बिनकामाची

  • यावर्षी कंत्राटदार आले नसल्याने सामाजिक संस्थांकडून कामे करून घेतली जात आहेत. कामगारांना गमबूट, हातमोजे तसेच जॅकेट घालण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असे टी वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • अनेक ठिकाणी कामगारांना अक्षरश चार फूट पाण्यात उभे राहून काम करावे लागते. यावेळी गमबूटमध्ये पाणी शिरल्याने त्यांना पाय उचलताही येत नाही. तसेच गमबूटात काही पाणी गेल्यास अधिक वाईट अवस्था होण्याच्या भीतीने कामगार त्याचा वापर करत नाहीत, असे एफ उत्तर विभागाचे वॉर्ड अधिकारी केशव उबाळे म्हणाले.
  • हातमोजे वापरल्यास जखमा होण्याचा वा ते निसटण्याचा प्रकार कमी होतो. पावसाळ्याआधी नाल्यातून कचरा काढण्यासाठी अत्यंत कमी काळ असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे, असे वॉर्ड अधिकाऱ्याने मान्य केले.

आजारांचे बळी

पालिकेत ३५ हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यातील २८ हजार कायमस्वरुपी आहेत. य़ाशिवाय दत्तक वस्ती योजनेअंतर्गत ८ हजार कर्मचारी आहेत. यातील कंत्राटी आणि दत्तक वस्ती योजनेतील कामगारांच्या मृत्यूची माहिती नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पालिकेतील कामगारांचे दरवर्षी सरासरी २०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.आत्यंतिक दुर्गंधी, घाणीचा परिसर व्यसनांमुळे आजाराला बळी पडतात, असे मिलिंद रानडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:10 am

Web Title: cleaning worker health question still not solved by government
टॅग : Government
Next Stories
1 नालेसफाईच्या मुळावर तबेले!
2 सारासार : उष्णतेचे बेट
3 ‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर लिहिते व्हा..
Just Now!
X