राज्यात धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करुन आरक्षण देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल करण्यात येत आहे, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाने केली आहे. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
नांदेड येथे नुकत्याच झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे जाहीर केले. त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून अभ्यास अहवाल मागविण्यात येत असल्याचे सांगितले. त्यालाच भारिपचे माजी आमदार हरिदास भदे तसेच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या संघटनेचे पदाधिकारी माजी आयपीएस अधिकारी मधु शिंदे, डॉ. जी.पी.बघेल व अॅड. एम. ए. पाचपोल यांनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने ज्या धनगड व धनगर या शब्दांच्या घोळात धनगर आरक्षण अडकविले आहे, तेच चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असा त्यांचा आरोप आहे. महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही. शसकीय दस्तऐवजांमध्ये ओरान व धनगर या जमातींचा उल्लेख आहे.
ओरान जमातीसारखीच धनगर ही जमात असून ते मूळचे द्रविडियन आहेत. या जमातीचे अस्तित्व तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये आहे. त्याला आधार म्हणून पुरावे उपलब्ध आहेत. असे असताना, पुन्हा नव्याने अहवाल मागविण्याची आवश्यकता नाही, असे या संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.