अटल बिहारी वाजपेयी २२ पक्षांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करु शकतात, त्यामुळे आम्ही कमीतकमी एका मित्रपक्षासोबत सरकार चालवू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप आणि शिवसेनेतील संघर्षावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. शिवसेनेकडून वारंवार करण्यात येणाऱ्या आरोपांवर बोलताना ‘मी सामना वाचत नाही,’ असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘मी शिवसेनेसोबत योग्य ताळमेळ कायम राखेन. यामध्ये चिंता करण्यासारखे काहीच नाही,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार होत असलेल्या वादांवर प्रतिक्रिया दिली. ‘लोकशाहीमध्ये एक पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला संपवू शकत नाही. कोणत्याही पक्षाचे भविष्य जनता ठरवते. आता नोकरशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आली आहे. नोकरशाही एका घोड्याप्रमाणे आहे आणि आम्हाला प्रशासन चालवण्यासाठी घोडेस्वारी करायची आहे,’ असेही फडणवीस या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

‘सुधारणा करणे हे आमचे काम आहे. त्यामुळे आम्ही निर्धारपूरक हे काम करत आहोत,’ असेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्याने केंद्रात संरक्षण मंत्रालयाचा पदभार देवेंद्र फडणवीसांना दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ‘तुम्ही दिल्लीला जाणार का?’ असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर बोलताना ‘आधी दिल्लीला होणारा हा कार्यक्रमदेखील आता मुंबईत होतो आहे. मग मी दिल्लीला का जाऊ?,’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘जीएसटीचा फायदा सर्व राज्यांना होईल’, असे म्हणत जीएसटी जुलैपासून लागू होईल, अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली.