मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले; अजितदादांना सूचक इशारा दिल्याची चर्चा

राजकीय सूडबुद्धीने कोणाविरुद्धही कारवाई केली जाणार नाही, पण पुरावे असल्यास कोणालाही मदत करणार नाही वा सोडणारही नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांना सुनावले. मुख्यमंत्र्यांचा हा इशारा अजित पवार यांना उद्देशून आहे का, अशी चर्चा मग सुरू झाली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये उमटले. राजकीय सूडबुद्धीने भाजप सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला. भाजपचा एक खासदार सकाळी कारवाई होणार, असे सांगतो आणि रात्री तशी कारवाई होते यावरून भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून हे सारे सुरू असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्यांचा सारा रोख हा खासदार किरीट सोमय्या यांच्यावर होता. ‘इतर मागासवर्गीय समाजाचा नेता असल्यानेच कारवाई झाली,’ हा भुजबळ यांचा दावा साफ झूट असून, सरकारी पैशांचा अपव्यय केल्यानेच त्यांना अटक झाल्याचे अनिल गोटे (भाजप) यांनी सांगताच विरोधी सदस्य आक्रमक झाले.  विरोधी सदस्यांनी दिवसभराकरिता कामकाजावर बहिष्कार घातला. विधान परिषदेतही भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद उमटले. विरोधी सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कामकाज लवकरच गुंडाळण्यात आले. सूडबुद्धीचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध भुजबळ यांनीच गृहमंत्रिपदी असताना सूडबुद्धीने अटकेची कारवाई केली होती याकडे अतुल भातखळकर यांनी लक्ष वेधले.

भुजबळ यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाली, हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तपासयंत्रणेवर विधिमंडळाच्या माध्यमातून दबाव वाढविला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

भ्रष्टाचारप्रकरणी कोणाही विरुद्ध कारवाई होत असल्यास मदत केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचा हा रोख कोणाकडे होता याची कुजबुज नंतर विरोधी गोटात होती. अजित पवार व सुनील तटकरे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीची सावध भूमिका

भुजबळांच्या अटकेची हिंसक प्रतिक्रिया उमटू नये म्हणून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.  छगन भुजबळ यांच्या अटकेचे सारे खापर पवार यांनी भाजपवर फोडले. पक्षाचा एक खासदार अशी कारवाई होणार, तशी कारवाई होणार हे आगाऊ सारखे सांगत होता व त्याच पद्धतीने शासकीय यंत्रणांनी भूमिका घेतली. यावरून सत्ताधारी भाजपने राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केल्याचा आरोप पवार यांनी केला.

कार्यकर्त्यांची सुटका

भुजबळ यांच्या अटकेचा निषेध राज्यभरात होत असताना मुंबईतही त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  जमावबंदीच्या आदेशाच्या आधारे मुंबई पोलिसांनी शहरातील सात वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे २५० राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.  वरळीसह भांडुप, कुरार गाव, वांद्रे, विक्रोळी, देवनार आणि चेंबूर परिसरात राष्ट्रवदीच्या  कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला

धुळ्यात आनंदोत्सव

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. रस्त्यावर पेटते टायर फेकणे, खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, रास्ता रोको यासह काही गावात बंद पाळण्यात आला. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ात भाजप आमदार अनिल गोटे समर्थकांनी अटकेच्या कारवाईचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.ं

छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत काँग्रेसनेही सावध पवित्रा घेतला  . भुजबळ यांच्या अटकेला फक्त विरोध आहे, चौकशीला नाही, असा सूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लावला.    चव्हाण यांनी भुजबळांना अटक करण्याची गरज नव्हती, असे म्हटले.

मुख्यमंत्र्यांचा सवाल

तपासयंत्रणेला सबळ पुरावे मिळाले असल्यानेच भुजबळांना अटक झाली असावी. तसेच हा तपास केंद्र सरकारच्या तपासयंत्रणेकडून केला जात आहे. भ्रष्टाचार किंवा शासकीय पैशांचा गैरव्यवहार झाला असल्यास शासकीय यंत्रणांनी मूग गिळून गप्प बसावे किंवा हातावर हात ठेवून बसावे, अशी विरोधकांची अपेक्षा आहे का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

आश्चर्य अन् विनंतीही :  राज्यापुढे दुष्काळ, पाणी, चारा आदी महत्त्वाचे गंभीर प्रश्न असताना त्यावर चर्चा करण्याऐवजी विरोधक भुजबळ यांच्या अटकेच्या मुद्दय़ावरून राजकारण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधकांनी या अटकेचा कितीही बाऊ केला तरीही ही कारवाई कशामुळे झाली हे राज्यातील जनतेला समजले आहे. या सभागृहाचा वापर करून तपास यंत्रणेवर दबाव आणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

‘माझे काय चुकले..’

ज्या महाराष्ट्र सदनच्या कंत्राटावरून माझ्यावर अटकेची वेळ आली त्याचा निर्णय हा माझ्या एकटय़ाचा नव्हता तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता. मी फक्त तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली आणि त्यातून सरकारला फायदा करून दिला, असे सांगताना छगन भुजबळ यांनी, यात माझे काय चुकले, असा उलट सवाल मंगळवारी न्यायालयात उपस्थित केला. ५० वर्षांची सामाजिक-राजकीय सेवा केल्यावरही अटक करण्यात आल्याचे सांगताना भुजबळ भावुक झाले होते.

भुजबळांना कोठडीसाठी अटक करण्यात आली. त्या वेळेस अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) मारहाण झाली नाही ना वा त्रास देण्यात आला नाही ना याबाबत न्यायालयाने भुजबळांना आरोपीच्या पिंजऱ्यात बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी मला माझी बाजू मांडायची आहे, असे सांगून भुजबळांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे  सांगितले.आपल्याला काहीच माहीत नाही हे सांगितले तर ते असहकार्य होते का, असा सवालही त्यांनी केला. तसेच ज्या महाराष्ट्र सदनवरून हा सगळा खटाटोप सुरू आहे ते कंत्राट नव्हतेच. तर एका ‘झोपु’ योजनेअंतर्गतचा पुनर्विकास होता. मात्र या योजनेला रोखण्यासाठी एक गुंड त्रास देत होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून यात लक्ष घालण्यास सांगितले. त्या वेळी मी विविध विभागाच्या बैठका घेतल्या आणि त्यानंतर प्रस्ताव मान्य केला; परंतु बांधकाम व्यावसायिक चांगला नसल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्यावर पुन्हा एकदा नगरविकास खात्याच्या सचिवांनी नवा प्रस्ताव मांडला.

त्यावर बैठका होऊन मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि पुनर्विकासाचे काम चमणकर इंटरप्रायजेसकडे गेले; परंतु त्यातून बांधकाम व्यावसायिकांना होणारा फायदा त्यांना न मिळता शासनाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ‘झोपु’ योजनेतून महाराष्ट्र सदन, आरटीओ कार्यालय उभे राहिल्याचा पहिल्यांदाच घडले. त्यामुळे सरकारला फायदा करून दिला यात माझे काय चुकले, असा सवालही भुजबळ यांनी केला.   पैसे घेतले असा आरोप माझ्यावर केला जात आहे.

एमईटीच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना काढून टाकले म्हणून अन्य राजकारण्यांशी हातमिळवणी करून त्यांनी माझ्याविरोधात या कथा रचल्या आहेत.   ८०० कोटी रुपये कुठून आले मलाच माहीत नाही. ५० वर्षे सामाजिक-राजकीय क्षेत्रात सेवा केल्यानंतर अटक होण्याने दु:ख झाले आहे, असे भुजबळ म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी व मराठी माणसासाठी तुरुंगात जात होते. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याची वेळ आली,   ‘ शिवसेनेत असताना ’त्यांनी मराठी माणसासाठी आंदोलने केली व ते तुरुंगात गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली असून दोन्हीतील फरक लक्षात घेतला पाहिजे,

– सेना खासदार संजय राऊत