मुंबईतील प्लाझा या चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण हे दोघे तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजी सिनेमाचा शो आयोजित करण्यात आला आहे. तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाची चांगलीच क्रेझ सगळ्यांमध्येच पाहण्यास मिळते आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगण हे मंगळवारी तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तान्हाजी या सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तान्हाजी मालुसरे यांनी घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना तान्हाजी मालुसरे हे मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना या मोहिमेबाबत समजलं असता आधी लगीन कोंढण्याचे मगच माझ्या रायबाचे असे म्हणून तान्हाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले. हा किल्ला जिंकताना त्यांना वीरमरण आलं. गड आला पण माझा सिंह गेला असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजही हळहळले. तान्हाजी मालुसरे यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंह असा केला म्हणूनच कोंढण्याला नाव पडले ते सिंहगड.

हाच गौरवशाली इतिहास तान्हाजी सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी रोजच अनेक मॉल आणि सिंगल स्क्रिन असलेल्या ठिकाणी अबालवृद्धांची गर्दी होते आहे. आता मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अभिनेता अजय देवगणसोबत तान्हाजी सिनेमा पाहण्यासाठी प्लाझा या सिनेमागृहात जाणार आहेत असे समजते आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही आज सिटी सेंटर मॉल या ठिकाणी तान्हाजी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या प्लाझा या सिनेमागृहात तान्हाजी हा सिनेमा पाहणार आहेत.