भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर गस्तीवर असताना अपघातग्रस्त झाले आहे. मुरुडजवळच्या नांदगाव येथे लॅंडिंग करताना समुद्र किनारी ते कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ४ जण प्रवास करीत होते. यात एक महिला पायलट गंभीर असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या महिला कर्मचाऱ्याला नौदलाच्या हेलिकॉप्टरने उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. हा अपघात कशामुळे घडला याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, तटरक्षक दलातील हे गस्तीपथकाचे हेलिकॉप्टर असून नेहमीच्या गस्तीवर ते निघाले असताना अपघातग्रस्त झाले. नेमक्या कोणत्या कारणामुळे ते कोसळले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील हे घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची माहिती घेत आहेत. त्याचबरोबर नौदलाचे एक पथकही मदतीसाठी नांदगावला पोहोचले आहे.

मुरुड येथील अगदांडा येथे तटरक्षकदलाचा तळ आहे. येथून ये हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्याचे कळते. या हेलिकॉप्टरमधून महिला पायलटसह तीन जण प्रवास करीत होते. अपघातात ही महिला पायलट गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारांसाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.