मुंबई महापालिकेने १७ सार्वजनिक वाहनतळांमध्ये करोना संसर्ग चाचण्यांसाठी नमुना संकलन केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चाचण्या करण्यास अधिक गती मिळू शकेल.

दरम्यान, मुंबईमधील करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने गेल्या ६७ दिवसांमध्ये १९ हजार ५०० हून अधिक नागरिकांच्या चाचण्या केल्या असून वेळीच शोध लागल्यामुळे करोनाबाधितांवर उपचार करणे आणि संसर्गाचे प्रमाण मर्यादेत राखण्यात काही अंशी यश आले आहे.

करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी पालिकेने व्यापक प्रमाणावर चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने ३ फेब्रुवारी ते १० एप्रिल या काळात मुंबईतील १९ हजार ५४१ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. बाधित आणि संशयितांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येत आहेत.

देशातील अन्य राज्य आणि शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक व्यक्तींच्या करोनाविषयक चाचण्या करण्यात आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईत १९ हजार ५४१ म्हणजेच प्रत्येक १० लाखांच्या मागे १४९९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर केरळमध्ये १३ हजार, दिल्लीत १० हजार, तर तमिळनाडूत आठ हजार चाचण्या करण्यात आल्या असून प्रत्येक १० लाखांमागे हे प्रमाण अनुक्रमे ३९८, २९७ आणि २५२ इतके आहे. उर्वरित देशात एक लाख १० हजार ७२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांच्या मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करता याव्यात यासाठी पालिकेने आता १२ सार्वजनिक वाहनतळांच्या जागी करोना चाचणी संकलन केंद्रे सुरू केली आहेत. हायरिस्क गटातील संशयितांच्या येथे चाचण्या करण्यात येणार आहेत.

प्रत्येक वाहनतळावर दररोज २०० यानुसार तीन हजारांहून अधिक चाचण्या होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यासाठी थायरोकेअर, मेट्रोपोलीस, एसआरएल, ईन्फर्न, सबअर्बन डायनोस्टिक या पाच प्रयोगशाळांशी पालिकेने करार केला आहे. चाचण्यांची ठिकाणे : भायखळा, काळाचौकी, शिवडी, परळ-शिवडी, आर्टेशिया इमारत, लोअर परळ, इंडिया बुल्स फिनान्स सेंटर, एल्फिन्स्टन, कोहिनूर मिल, दादर, एक्सर व्हिलेज, बोरिवली (प.), विकास प्लाझा,  मुलुंड (प.), रूणवाल ऑडिटोरियम, मुलुंड (प.), रूणवाल ग्रीन, नाहूर, कांजूर व्हिलेज, कांजूरमार्ग, आर मॉलजवळ, विक्रोळी येथील वाहनतळ.

चाचण्यांची ठिकाणे : भायखळा, काळाचौकी, शिवडी, परळ-शिवडी, आर्टेशिया इमारत, लोअर परळ, इंडिया बुल्स फिनान्स सेंटर, एल्फिन्स्टन, कोहिनूर मिल, दादर, एक्सर व्हिलेज, बोरिवली (प.), विकास प्लाझा,  मुलुंड (प.), रूणवाल ऑडिटोरियम, मुलुंड (प.), रूणवाल ग्रीन, नाहूर, कांजूर व्हिलेज, कांजूरमार्ग, आर मॉलजवळ, विक्रोळी येथील वाहनतळ.