अग्निसुरक्षेसंबंधी जनजागृती करण्यासाठी १४ एप्रिलपासून अग्निसुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे. यानिमित्ताने टॉवरमधील आगीच्या घटना, अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी होणारा विलंब, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेली मोहीम आणि पारदर्शक पद्धत यासंबंधी मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्याशी साधलेला संवाद..

प्रभात रहांगदळे,
प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल

* शहरातील उंच इमारतींमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या. या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबत आता प्रतिसाद मिळतो का?
आग लागलेल्या बहुतांश इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. त्यांना आम्ही तातडीने नोटीस बजावल्या व त्यांची जलजोडणी व विजेचे कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांनी तातडीने व्यवस्था सुधारली.
* पण ज्या इमारतींमध्ये आगीची घटना घडलेली नाही, त्यांचे काय..?
अग्निसुरक्षा नियम, त्यांची अंमलबजावणी तसेच त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी आम्ही जनजागृती करतो आहोत. त्याला यावर्षी प्रतिसाद मिळाला. पण तो अर्थातच समाधानकारक नाही. प्रत्येक इमारतीत जाऊन तपासणी करण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागेल, त्याची आज अग्निशमन दलाकडे कमतरता आहे. आणि म्हणूनच प्रत्येक रहिवासी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.
* आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला विलंब होत असल्याचे दिसते. त्यावर लघु अग्निशमन केंद्र उभारण्याचे योजले होते. ते काम कुठवर आले आहे?
रहदारी आणि अरुंद गल्ल्या यामुळे अग्निशमन दलाला पोहोचायला वेळ लागतो. त्यातूनच या लघु अग्निशमन केंद्राची कल्पना पुढे आली. या योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यावर आहे. शहरात १७ ठिकाणी ही केंद्रे जानेवारीपर्यंत सुरू होतील. जिथे पालिकेची इमारत नाही तेथे कंटेनर कार्यालय असेल. चार कर्मचारी तसेच अग्निशमन गाडी तेथे तैनात ठेवली जाईल. या केंद्रांसाठी अत्याधुनिक संपर्क यंत्रणेचाही वापर करण्यात येईल. त्यामुळे तातडीने आग लागलेल्या ठिकाणी पोहोचता येईल.
* अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या मॉल, दुकाने, उपाहारगृहांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती, त्याचे काय झाले?
आमच्याकडे ९० अग्निशमन अधिकारी आहेत. त्यांनी दर आठवडय़ाला किमान एका ठिकाणाची अग्निसुरक्षा तपासण्याचे बंधन घातले गेले. आता हाती आलेल्या माहितीनुसार ८० टक्के ठिकाणी अग्निसुरक्षेत त्रुटी आहेत. केवळ अग्निसुरक्षा प्रणाली लावणे पुरेसे नाही तर ती कार्यरत असल्याचेही नियमितपणे पाहावे लागते. अनेक ठिकाणी याचीच वानवा दिसते.
* अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याचे नियम व पद्धत किचकट आहेत. यात अधिक पारदर्शक पद्धत आणण्याची गरज आहे का?
ही पद्धत अधिक पारदर्शक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निसुरक्षा प्रणालीत काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारण्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली जाते. थेट कारवाई होत नाही हे रहिवाशांनी लक्षात घ्यावे. याशिवाय अग्निशमन दलाकडून होत असलेली तपासणी व त्यानंतर केलेली सुधारणा याबाबत थेट माहिती मिळण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्यात येत आहे. याशिवाय सध्या प्रायोगिक तत्त्वावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून सकाळी १०.३० ते संध्या. ५.३० याकाळात नागरिकांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शंकांचे निरसन करता येईल.
* देवनार कचराभूमीची आग विझवण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्यामुळे टीका झाली होती. त्यानंतर आता प्रक्रिया न केलेले पाणी वापरले जात आहे..
यानिमित्ताने पाण्याचा आणखी एक चांगला पर्याय अग्निशमन दलाला मिळाला आहे. सध्या आम्ही चेंबूर येथील तलावातून पाणी घेत आहोत. वॉटर हायड्रंटची प्रणाली आता फारशी कार्यरत नाही. त्यामुळे आम्ही मोठय़ा टँकरचा उपयोग करतो. यासाठी प्रक्रिया न केलेले पाणी वापरता येईल तसेच काही वेळा आम्ही समुद्राचे पाणीही वापरले आहे. पिण्याचे पाणी वाचवता येत असेल तर या पर्यायांचा वापर करणे हितकारकच आहे.
* सामान्य नागरिकांनाच अग्निसुरक्षेचे तंत्र शिकवून कार्यकर्ता घडवण्याचा उपक्रम तुम्ही आखला होता, त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे?
या सप्ताहात शहराच्या विविध भागात जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत. याआधी आम्ही प्रायोगिक स्तरावर अग्निसुरक्षा कार्यकर्ते तयार करण्याचा उपक्रम घेतला होता. त्यात तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी अभिमानाने बिल्ला लावून या कार्यक्रमांमधून सहभाग घेतला. त्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळाले. अग्निसुरक्षा कार्यकर्ते तयार करणे हे सोपे काम नाही, हे मला मान्य आहे. पण नागरिकांच्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढला आहे.
प्राजक्ता कासले