औषधनिर्माणशास्त्र विषयात पदविका प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केंद्रीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) मान्यता दिलेल्या औषधविक्री दुकानातच प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणे बंधनकारक असून, यासाठी औषधविक्रेत्यांनी नोंदणी करण्याची सूचना परिषदेने दिली आहे. मान्यताप्राप्त औषधविक्री दुकानांनाच प्रशिक्षण देण्याचा अधिकार असेल, असे पत्राद्वारे परिषदेने स्पष्ट केले आहे.

डी. फार्मच्या विद्यार्थ्यांना ‘फार्मासिस्ट’ म्हणून नोंदणी करण्यापूर्वी तीन महिने औषधविक्री दुकानात प्रात्यक्षिक अनुभव घेणे बंधनकारक आहे. औषधनिर्माणशास्त्र सेवा नियम, २०१५ कायद्याअंतर्गत या विद्यार्थ्यांनी पीसीआयने मान्यता दिलेल्या दुकानातच प्रशिक्षण घेणे अपेक्षित आहे. याच्या अंमलबजावणीची सुरुवात केली असून यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी उत्सुक असलेल्या औषधविक्री दुकानांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे आवश्यक कागदपत्रे देण्याची सूचना संबंधित महाविद्यालये आणि राज्य परिषदेला केली आहे.

सरकारी रुग्णालयाव्यतिरिक्त अन्य खासगी औषधविक्री दुकानांना प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता घेणे गरजेचे आहे. याची प्रक्रिया परिषदेने सुरू केली असल्याचे पत्रामध्ये नमूद केले असले तरी प्रत्यक्ष औषधविक्री दुकानदारांनी यासाठी कोणाकडे संपर्क साधावा, हे मात्र स्पष्ट केलेले नाही.

राज्यात फार्मसीच्या २०० संस्था असून यातून दरवर्षी किमान १२ हजार विद्यार्थी पदविका प्राप्त करतात. या तुलनेत सरकारी रुग्णालयांशी संलग्न औषधविक्री दुकाने उपलब्ध नसल्याने खासगी दुकानांमध्ये प्रशिक्षण घेतात. यासाठी नोंदणीकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून औषध दुकानांना मान्यता देण्यासाठी जवळपास अडीचशे औषधविक्री दुकानांची यादी परिषदेकडे पाठविली होती. मात्र त्यावर पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त औषधविक्री दुकाने उपलब्ध झाल्यानंतर हा नियम लागू करणे योग्य होईल.

-सायली मिसाळ, निबंधक, राज्य फार्मसी परिषद