05 March 2021

News Flash

वीकेण्ड विरंगुळा : संगीत नाटकांच्या स्मृती जागवणारा ‘नमन नटवरा’

भारतीय नाटय़शास्त्राची रचना करून भरतमुनींनी नाटय़कलेला शास्त्रीय रूप दिले.

भारतीय नाटय़शास्त्राची रचना करून भरतमुनींनी नाटय़कलेला शास्त्रीय रूप दिले. सध्या पाश्चिमात्य नाटकांच्या प्रयोग व संहितांचा प्रभाव आपल्याकडच्या नाटकांवर अधिक दिसत असला तरी भरतमुनींच्या नाटय़शास्त्राचाही प्रभाव नाकारता येत नाही. नाटकाच्या रंगमंचावरील प्रयोगाशी निगडित अभिनय, नेपथ्य, संगीत आदी सर्व बाबींवर प्रकाश टाकणाऱ्या नाटय़शास्त्राला नाटय़कलेच्या वाटचालीत विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड शतकात रसिकांनी विविध प्रकारच्या नाटकांचा आस्वाद घेतला. यात संगीत नाटके हा प्रकार अनेकांच्या जिव्हाळ्याचा भाग आहे. मराठी रंगभूमीवरील संगीत नाटके हा एक सुवर्णकाळच होता. त्याचीच सुखद आठवण करून देण्यासाठी रविवारी, भरतमुनी जयंती उत्सवानिमित्त ‘संस्कार भारती, गोरेगाव पूर्व’ समितीकडून ‘नमन नटवरा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मराठी नाटय़सृष्टीचा संक्षिप्त आढावा घेणाऱ्या ‘नाटय़रंग’ या कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अंकिता सोवनी यांच्या संकल्पनेतून नाटय़रंगची निर्मिती झाली असून यात डॉ. अर्चना शहाणे, मल्हार फडके, ओंकार अग्निहोत्री, सुप्रिया साबळे, श्रृती नांदोस्कार आदी कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच यावेळी ‘भरतमुनी’ हा कार्यक्रमही होणार असून याचे निवेदन डॉ. शिरीष ठाकूर करणार आहेत. याशिवाय रसिकांना यावेळी नाटय़संगीताची सुरेल स्वरांची मेजवानी मिळणार आहे. मंजुषा रानडे यांच्या सूत्रसंचालनाखाली होणाऱ्या या सांगीतिक कार्यक्रमात पंडीत तुळशीदास बोरकर यांचे ऑर्गनवादन होणार असून त्यांना धनंजय पुराणिक साथ संगत करणार आहेत. संपर्क – ९८२१७२०८२६.
* कधी- रविवार, १० एप्रिल, सायंकाळी ५ ते ७
* कुठे- भानुबेन नानावटी कलाघर, नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव (पूर्व)

समकालीन चित्रकलेची ‘ग्रेस’
चित्रकला हा अनेकांच्या आवडीचा विषय. मुंबईमध्ये विविध कलादालनांमध्ये चित्रांची प्रदर्शने भरविली जातात. या माध्यमातून विविध चित्रांचा आस्वाद घ्यायला मिळतो. समकालीन चित्रकार हाताळत असलेले विषय, त्यांच्याकडून केले जाणारे चित्रांमधील प्रयोग, त्यांची कलादृष्टी या प्रदर्शनांमधून जाणून घेता येते. देशभरातील समकालीन चित्रकारांच्या चित्रांचा आस्वाद घेण्याची अशीच एक संधी चित्रकलाप्रेमींना ७ ते १० एप्रिलदरम्यान मिळणार आहे. ‘जयगुरु आर्ट्स’ या संस्थेतर्फे ‘ग्रेस’ या शीर्षकांतर्गत समकालीन चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात देशाच्या विविध भागातील ३० चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. विविध प्रादेशिक संस्कृतींचा वारसा जपणाऱ्या या चित्रकारांनी त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांची अभिव्यक्ती आपल्या चित्रांतून केली आहे. यात मूर्त, अमूर्त, व्यक्तिरूपात्मक तसेच सृजनशील अशा अनेक शैलींमधील चित्रे पाहता येणार आहेत. तैलरंग, जलरंग, अक्रॅलिक, मिश्र माध्यम, सिरॅमिक अशा विविध रंगशैलीत काढलेली चित्रे एकत्र पाहण्याची पर्वणी या निमित्ताने चित्रकलाप्रेमींना मिळणार आहे. यात पृथ्वी सोनी, बनी प्रसाद, पॉली कौर, सोनाली चौधरी, सुमिता डे, शुभांगी खोत, सुंदर गुर्जर, शशिकांत चारबे आदी चित्रकारांच्या चित्रांचा आस्वाद घेता येईल. संपर्क – ९८९२०११६९६.
* कधी- ७ ते १० एप्रिल, स. ११ ते सायं. ७
* कुठे-प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर, कलादालन, सोडावाला लेन, बोरिवली (प.)

‘फिलहार्मनी’ चित्रप्रदर्शन
मुंबईस्थित प्रख्यात चित्रकार मधुसूदन कुमार यांनी अलीकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘फिल-हार्मनी’ हे एकल चित्रप्रदर्शन मांडण्यात येणार आहे. जगविख्यात सतारवादक उस्ताद विलायत खाँ यानी म्हटलं आहे की ‘आखों से सुनो और कानों से देखो’. “संगीत हे निसर्गासारखाच विविध सुंदर गोष्टींचा मिलाफ आहे” असं पॉल सेझन म्हणत असे. ‘फिल-हार्मनी’मधील चित्रं ही अशीच अवकाशातील सुमधुर संगीत रंगांच्या मार्फत कॅनव्हासवर घेऊन आली आहेत. चित्रकार मधुसूदन कुमार यांनी अर्धमूर्त, अमूर्त अशा आशयाची चित्रं रेखाटताना निसर्गाचा कल उत्तम रीतीने सांभाळला आहे. भारतीय राग-रागिणींच्यामध्ये निसर्ग आणि परमेश्वराशी नातं जोडण्याचं सामथ्र्य आहे.
* कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा
* कधी: ११ ते १७ एप्रिल

* स्पंदन’ कलेचा आंतरराष्ट्रीय महोत्सव
देशविदेशातील दोनशेहून अधिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलेचे प्रदर्शन मुंबईमध्ये भरविण्यात येणार आहे. एन्हान्स समूहाकडून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आदिती अग्रवाल, अमीना नवीवाला, अरविंद वैधनकर बाबुभाई कोठिया आदी नामवंत कलाकार भाग घेणार आहेत. स्पंदन हा सहावा फेस्टिव्हल असून यापूर्वी गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमध्ये भरविण्यात आला आहे. यामध्ये जवळपास आठशे कलाकरांनी भाग घेतला होता.
* कुठे: कुमारस्वामी हॉल आर्ट गॅलरी, म. गांधी रोड, फोर्ट
* कधी: १० ते १४ एप्रिल, ११ ते ७ वाजेपर्यंत.

संगीत सम्राट अल्लादियाँ खान संगीत महोत्सव
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतबद्दल भारतातीलच नव्हे, तर जगभरच्या संगीतप्रेमींनाही आकर्षण आहे. संगीतामुळे संस्कृतीला समृद्धी प्राप्त होत असते. भारतीय संस्कृतीच्या समृद्धीमध्ये गेल्या काही शतकांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने भरच टाकली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मूळे हजारो वर्षांच्या भारतीय संस्कृतीत खोलवर पोहचलेली आहेत.
भारतातील विविध धर्म, प्रादेशिक संस्कृती, रूढी, परंपरा यांच्यातील विविधतेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. जगभरातील संगीत रसिकांना या संगीताबद्दल कुतुहल आहे. यात अल्लादियॉं खान हे नाव तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून ‘संगीतसम्राट अल्लादियॉं खान संगीत महोत्सव’ भरवला जात आहे. ७ ते १० एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. यात वर्षां सोहोनी, शाश्वती मंडल, पंडित
तुळशीदास बोरकर, पंडित ब्रीज नारायण, आशना जैन आदी शास्त्रीय संगीतातील मान्यवर सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने या आठवडय़ात संगीत रसिकांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वाना प्रवेश विनामुल्य आहे. संपर्क ९८६७८९१२३५.
* कधी- ७ ते ९ एप्रिल दुपारी ३ ते रात्री १० वा. व १० एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते रात्री १० वा.
* कुठे- बाल विकास संघ सभागृह, बाल
विकास संघ मार्ग, गांधी मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ, चेंबूर.

* द क्रिस्टल क्लिअर फेसेस’ चित्रप्रदर्शन
मुंबईस्थित प्रसिद्ध चित्रकार मिथुन सिंग यांचं ‘द क्रिस्टल क्लिअर फेसेस’ हे चित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व कलारसिकांना विनामूल्य खुलं राहील. चित्रकार मिथुन सिंग या चित्रकाराने साकारलेली पोटर्र्ेट या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. भौमितिक आकार असलेली गडद रंगातील आकर्षक पोटर्र्ेट हे त्यांचं वैशिष्टय़ आहे. जलरंगातील अँजेलिना जोली, जेनिफर लोपेज, पॅरिस हिल्टन, टीना अंबानी अशा नामवंतांची नयनरम्य पोर्ट्रेट साकार केली आहेत. चित्रांचा पृष्ठभाग सपाट वाटला तरी भूमितीय आकाराच्या रचनेमुळे त्यामध्ये त्रिमितीय (थ्रीडी) भास होतो.
* कुठे: कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, २२६ नरिमन पॉइंट, ’ कधी: ९ एप्रिलपर्यंत

श्रीकृष्णाचा चित्ररूप चरित्रप्रवास
आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अत्यंत नाटय़पूर्ण आयुष्यपट असलेला युगंधर म्हणजे श्रीकृष्ण! मथुरेच्या कारागृहात जन्मलेला, नंदाघरी आपल्या बाललीलांनी संपूर्ण गोकुळाला आपलंसं करणारा, कालिंदीच्या तीरावर राधेला भेटण्याची आस लावणारा, यमुनेकाठी रास रचणारा, कालिया-कंसादी असुरांना मारणारा, रणछोडदास म्हणून युद्धभूमीतून पळून जाणारा आणि त्याच समरभूमीवर गीतेसारखं तत्त्वज्ञान सांगणारा आणि शेवटी एका अरण्यात पारध्याच्या बाणाने घायाळ होऊन देहत्याग करणारा.. श्रीकृष्णाच्या अशा अलौकिक आयुष्याची अनेक रूपे ‘एक्सप्लोअरिंग युगंधर’ या चित्र प्रदर्शनातून पाहता येणार आहेत. चित्रकार बी. ए. कुलकर्णी यांनी साकारलेली ही चित्रमालिका जहांगीर आर्ट गॅलरीत प्रेक्षकांसाठी खुली असेल. मथुरेच्या कारागृहातील त्याचा जन्म, गोकुळातील बाललीला, हस्तिनापुरातील त्याची राजकीय कारकीर्द आणि द्वारकेचा राजा अशा विविध टप्प्यांवरील ‘कृष्णरंग’ या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. कुलकर्णी यांच्या वास्तववादी शैलीमुळे महाभारत आणि भागवत पुराण साजिवंत झाल्यासारखे भासते. त्याशिवाय कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध विषयांवर रेखाटलेली चित्रेही या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
* कधी – ५ एप्रिल ते ११ एप्रिल या दरम्यान सकाळी ११.०० ते सायं. ७.०० वाजता.
* कुठे – जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, एम. जी. मार्ग, फोर्ट, मुंबई.

* शिव संगीतांजली’
* शिव संगीतांजली’चा (एस आर बी पटेल ट्रस्ट) वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अमरेंद्र धनेश्वर (ग्वाल्हेर घराणे) आणि नित्यानंद हळदीपूर (मैहर घराणे) हे
कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. या दोघांना तबल्यावर शंतनू शुक्ल, तानपुऱ्यावर प्रकाश नाईक आणि हार्मोनियमवर रवींद्र लोमटे साथ देणार आहेत.
* कुठे: सावरकर सभागृह, शिवाजी पार्क
* कधी: ९ एप्रिल, दुपारी ३ ते ६.
संकलन : शलाका सरफरे,प्रसाद हावळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 4:49 am

Web Title: concerts events in mumbai
Next Stories
1 ‘गिफ्ट’ला पूरक वित्तीय सेवा केंद्र उभारणार
2 लोकप्रभा वर्धापनदिनाच्या अंकात ‘महाभारताची कालनिश्चिती’
3 जुन्या लोकलचा अखेरचा प्रवास
Just Now!
X