राज्यभरात नव्याने देण्यात येणाऱ्या एक लाख रिक्षा परवान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतासंबंधीची अट शिथिल करण्याचा विचार राज्य परिवहन विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार रिक्षा परवान्यासाठी आवश्यक असणारी शिक्षणासंबंधी अट दहावी उत्तीर्ण ऐवजी आठवी उत्तीर्ण केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र राज्य परिवहन विभागाकडून नवीन परवान्यांसाठी ही अट शिथिल करण्याचा विचार केला जात आहे. नव्या नियमानुसार २००७ सालानंतर ज्या उमेदवाराकडे रिक्षा चालवण्याचा परवाना आणि बिल्ला असेल अशा व्यक्तीसाठी दहावी ऐवजी आठवी उत्तीर्णची अट ठेवण्यात येणार आहे. परंतु ज्या अर्जदाराकडे २००७ सालाच्या आधी तीनचाकी वाहन चालवण्याचा परवाना असेल त्यांच्यासाठी शिक्षणाची अट दहावी उत्तीर्णच असणार आहे.
गेल्या वर्षी लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आलेल्या परवान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतासंबंधी अटीची पूर्तता उमेदवार करू न शकल्याने प्रादेशिक परिवहन विभागाला परवान्यांचे वितरण करणे अडचणीचे होऊन बसले. त्यामुळे अंधेरी आरटीओतील ४ हजार ७१२ तर वडाळा आरटीओतील ४ हजार २०१ परवाने असे एकूण ८ हजार ९१३ परवाने वितरण होऊ शकले नाहीत. याच पाश्र्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने या अटी शिथिल करण्याचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.