काँग्रेस आमदारांची पक्षनेतृत्वाकडे मागणी

राज्यसभेसाठी बाहेरच्या राज्यातील उमेदवार लादू नका, अशी उघड मागणी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी केली. तसेच विधान परिषदेची एक की दोन जागा लढवाव्या, यावरून पक्षात मतभेद आहेत. राष्ट्रवादीला झुकते माप देण्यास या वेळी आक्षेप घेण्यात आला.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आमदारांची मंगळवारी बैठक झाली. राज्यसभेसाठी बाहेरच्या राज्यातील नेत्याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर बाहेरच्या तील नेत्याचे ओढणे गळ्यात बांधू नका, राज्यातील कोणत्याही नेत्याला संधी द्या, अशी मागणी काँग्रेस  आमदारांकडून करण्यात आली.

काँग्रेसमध्ये अशी उघडपणे मागणी कधी केली जात नाही. बाहेरचा उमेदवार लादू नका, अशी मागणी करण्याचे धाडस पक्षाच्या आमदारांनी या वेळी मात्र दाखविले. दिल्लीत भाजपचे वर्चस्व असल्याने काँग्रेसने विश्वासातील उमेदवारांचा आग्रह धरल्याचे चित्र आहे. राज्यसभेचे खासदार पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये निधी खर्च करतात याबद्दल आक्षेप घेण्यात आला. राज्यसभा आणि विधान परिषदेचे उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार आमदारांनी पक्ष नेतृत्वाला दिले.

अशोक चव्हाणांची सावध भूमिका

गेल्या वर्षी तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता याकडे आमदारांनी लक्ष वेधले. मतांचे योग्य नियोजन केल्यास दोन जागा निवडून येऊ शकतात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. आघाडीचे चार उमेदवार िरगणात उतरल्यास भाजपकडून सहावा उमेदवार रिंगणात उतरविला जाऊ शकतो. भाजप आणि राष्ट्रवादी परस्परांमध्ये पडद्याआडून समझोता करतील आणि काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, अशी भीती व्यक्त केली गेली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली आहे. पक्षाच्या उमेदवाराला दगाफटका झाल्यास त्याचे सारे खापर पुन्हा अशोकरावांवर फुटू शकते. उपसभापतिपदाच्या बदल्यात काँग्रेसने एक जागा लढवावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.