प्रदेश काँग्रेसचे आदेश

मुंबई : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत पक्षादेश धुडकावून विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या १८ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे दाखल करावे, असे आदेश प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून हा पक्षशिस्तीचा भंग आहे. पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या या सर्व नगरसेवकांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे थोरात यांनी म्हटले आहे. याबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे आदेश भिवंडी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शोएब अशफाक गुड्डू व महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अन्सारी मो. हलीम मो. हारुन यांना दिले आहेत.

यासंदर्भात गुम्ड्डू यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडे पूर्ण बहुमत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच महापालिकेतील इतर पदांचे वाटप करण्यासंदर्भात आपण आपल्या स्तरावर निर्णय घेऊनही सर्व सदस्यांना एकसंध ठेवू शकला नाहीत, यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आपण तीन दिवसांत लेखी खुलासा केला नाही तर, आपल्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड्. गणेश पाटील यांनी ही माहिती दिली.