डेहराडून एक्स्प्रेसच्या आगीमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुरक्षित प्रवास याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे येथे यार्डात उभ्या असलेल्या एका उपनगरीय गाडीच्या डब्याला आग लागली होती. सुदैवाने गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली होती. तर बंगळूर-नांदेड या गाडीच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीत २६ जणांचा मृत्यू झाला होता.  
आगीबाबत विविध तर्क-वितर्क
या आगीबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हुक्क्यामुळे आग लागल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर एका डब्यातील इलेक्ट्रिक बोर्डावरील वायरी जळाल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागलेली नाही. आगीचे नेमके कारण चौकशीअंती स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी स्पष्ट केले. तर एखाद्या ज्वलनशील पदार्थामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी व्यक्त केली. मात्र खरे कारण चौकशीनंतरच समजेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.