संदीप आचार्य 
मुंबई: जागतिक आरोग्य संघटनेने धारावीतील पालिकेच्या करोना लढाईचं कौतुक केले असले तरी तशी परिस्थिती आज संपूर्ण मुंबईत दिसत आहे. महापालिकेने करोना चाचण्यांचे प्रमाण तब्बल दोन हजाराने वाढवूनही करोना रुग्णांच्या रोजच्या संख्येत घट झाली आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास एक हजाराने कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात मात्र रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांच्या प्रमाणात जवळपास नऊ हजाराने वाढ झाली आहे.

“मुंबई महापालिकेने गेल्या काही दिवसात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास सुरुवात केली यामागे जास्तीतजास्त करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील रुग्ण शोधणे हा प्रमुख हेतू होता. तसेच रुग्णसंख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड वाढवणे अतिदक्षता विभागातील बेड वाढविण्या बरोबरच संस्थात्मक विलगीकरण व्यवस्थेचाही विस्तार केला आहे. यापूर्वी मुंबईत रोज करोनाच्या साधारणपणे चार ते साडेचार हजार चाचण्या व्हायच्या त्या वाढवून आम्ही काल ६८०० चाचण्या केल्या”चे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

ज्यावेळी चार हजार चाचण्या व्हायच्या तेव्हा करोना रुग्णांचे प्रमाण तेराशे ते साडे चौदाशे रुग्ण एवढे होते. मात्र काल ६८०० चाचण्या केल्यानंतर केवळ १२४३ करोना रुग्ण आढळून आले असून त्यातही लक्षण असलेले म्हणजे ज्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे फक्त २०० रुग्ण आढळल्याचे आयुक्त चहेल म्हणाले. मुंबईत आज करोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण बेड पैकी ७००० बेड रिकामे आहेत तर अतिदक्षता विभागातील २५० बेड रिकामे असून गेल्या काही दिवसात हे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण हे आता ५० दिवसांपर्यंत गेले असून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

मुंबईत कालपर्यंत करोनाचे एकूण ९२,९८८ रुग्ण आढळून आले असून ६४,८७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार्यांची संख्या २३ हजारापेक्षा जास्त होती तर आज ही संख्या २२,५४० एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५.१५ टक्के एवढे असून आजपर्यंत १,४०,३२५ एवढे रुग्ण बरे झाले आहेत तर मुंबईत हेच प्रमाण आता ६७ टक्यांवरून ७० टक्के एवढे झाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. याबाबत आयुक्त चहेल यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यामुळे आगामी काळात कदाचित रुग्णांची संख्या वाढेलही मात्र तात्काळ व प्रभावी उपचार व्यवस्थेमुळे रुग्ण बरे होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. एकीकडे रुग्ण शोधाबरोबरच रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यावरही भर देण्यात आला आहे. यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे लोकही आता पुढे येऊन माहिती देत आहेत.

कंटनमेंट म्हणजे बाधित विभागांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बीड लोकांमध्ये व्यापक जनजागृती सुरु आहे. यातूनच लोक जास्तीत जास्त काळजी घेऊ लागले आहेत. मुंबईसारख्या लोकसंख्येची प्रचंड घनता असतानाही सुरक्षित अंतर राखणे, मुखपट्टीचा वापर व सॅनिटायझेशनचा मंत्र पालिकेकडून सतत जपला जात असून त्याचेही परिणाम आता दिसू लागल्याचे आयुक्त चहेल यांनी सांगितले. ६८०० चाचण्या केल्यानंतर केवळ १२४३ रुग्ण सापडतात आणि जवळजवळ सात हजार बेड रिकामे आहेत यातच सारे काही स्पष्ट होते, असेही आयुक्त म्हणाले. धारावीतील करोना लढाईची दखल ‘जागतिक आरोग्य संघटने’ने घेतली असून आम्ही जराही गाफील नसल्याचे आयुक्त चहेल म्हणाले.

एकीकडे मुंबईत करोनाची परिस्थिती सुधारत असताना ठाणे जिल्ह्यात मात्र करोना रुग्णांची वाढ चिंता निर्माण करणारी आहे. ठाण्यात एकूण ६१८६९ रुग्ण आढळले असून आतापर्यंत १६४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे मुंबईत करोनाचे अॅक्टिव्ह म्हणजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कराव्या लागणार्या रुग्णांचे प्रमाण एक हजाराने कमी होऊन २२,५४० एवढे झाले असताना ठाण्यात मात्र अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण एका आठवड्यात २५,३५४ वरून वाढून ३३,७३३ एवढे झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या १४,७५७ एवढी आहे तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही करोना रुग्णांची संख्या १४,६११ एवढी झाली आहे. त्याखालोखाल नवी मुंबईत १०,८३७ रुग्णसंख्या असून मीरा भाईंदरमध्येही पाच हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. याची गंभीर दखल घेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जम्बो रुग्णोपचार केंद्र सुरु करण्याचा आदेश दिला असून तात्पुरती व्यवस्था म्हणून मुंबई महापालिकेने मुलुंड चेकनाका येथील आपल्या तात्पुरत्या उभारलेल्या एक हजार बेडच्या रुग्णालयातील ५०० बेड ठाण्यातील रुग्णांसाठी राखून ठेवले आहेत.