परवानगीबाबत आरोग्यमंत्र्यांकडून ठोस भूमिका नाही
मुंबई : करोना लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाला परवानगी, दुकानदारांना सवलती, प्राथमिक शाळा सुरू करणे, या मुद्द्यांसह निर्बंध शिथिलीकरणाबाबत जनमताचा रेटा वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र नेहमीप्रमाणे चर्चेचेच वळसे दिले आहेत. मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील असे टोपे यांनी पालुपद लावले. अधिकार नसताना रेल्वे प्रवासाची आशा दाखविता कशाला, असा सवाल आता जनताच करू लागली आहे.

अनेक घटकांकडून मागणी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृती गटाशी लवकरच चर्चा करण्यात येईल आणि  निर्बंध शिथिल करणे किंवा रेल्वे प्रवासाच्या परवानगीबाबत ते उचित निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष दिलासादायक आहेत. लहान मुलांमध्येही प्रतिपिंडे आढळल्याने त्यांना फारसा धोका नाही, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. पण मुलांचे लसीकरण होत नसल्याने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक धोका मुलांना असल्याची शक्यता आयसीएमआरने वर्तविली होती. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा पातळीवरील रुग्णालयात लहान मुलांवर उपचार करण्याची सोय केली आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी यासंदर्भात सूचना दिल्यास प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत योग्य निर्णय मुख्य मंत्री पातळीवर घेता येईल. लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी होत आहे. पण गर्दी लक्षात घेता याबाबत तपासणी करण्यात व्यावहारिक अडचणी आहेत. किमान ७० टक्के लसीकरण झाले आणि करोना रुग्णसंख्या आणखी घटली, तर निर्बंध शिथिलीकरण करता येईल, असे मत टोपे यांनी व्यक्त केले.

राज्यातील दररोजची नवीन करोना रुग्णसंख्या सहा ते सात हजारांच्या घरात गेले काही दिवस स्थिर आहे. ती अजून कमी व्हायला हवी. केंद्र सरकार च्या तज्ज्ञांच्या पथकानेही निर्बंधांचे कसोशीने पालन करण्याची सूचना केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर) कडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे राज्य सरकारकडून तंतोतंत पालन करण्यात येत आहे. त्यांनी निर्बंध शिथील करण्याबाबत सूचना केल्यास कार्यवाही करता येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्याला एक महिन्यात तीन कोटी लस मात्रा मिळाव्यात, यासाठी  टोपे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

भाजपचा आंदोलनाचा इशारा

दुकाने, खासगी कार्यालये व इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरी लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. त्यामुळे करोना लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना  लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारने आठवडाभरात न दिल्यास भाजपकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी दिला.