|| संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी घरोघरी लसीकरणाची भूमिका राज्य कृती दलाने घेतली आहे. तसेच लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे अग्रक्रमाने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ मे रोजी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय केंद्राने जाहीर केल्यापासून लसीकरणाचा मोठाच गोंधळ देशभरात सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार  लसींचा पुरेसा पुरवठा करत नसतानाच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यामुळे राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४५ वर्षांपुढील लोकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही या पाश्र्वाभूमीवर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना एकाच वेळी लस देण्याचे धोरण स्वीकारल्यास महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्यांने लस दिली जावी, अशी भूमिका राज्य कृती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव विकास खारगे, कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

लसीकरणाचा वेग वाढवताना शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून लशींचा होणारा पुरवठा तसेच एकूण उपलब्ध होणाऱ्या लशींची संख्या लक्षात घेता ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जावे, अशी भूमिका बैठकीतील सदस्यांनी मांडली. अजूनही ४५ वर्षांपुढील लोकांची लशीची दुसरी मात्रा शिल्लक आहे. त्यामुळे ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे आधी लसीकरण करावे अशी भूमिका डॉ. जोशी यांनी मांडली. याबाबत डॉ. जोशी यांना विचारले असता, तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे, संसर्ग दर कमी करणे तसेच गर्दी टाळणे, मुखपट्टी व सुरक्षित अंतर यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. चाचण्यांचा संसर्गदर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे. तसेच जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे व लोकांनी करोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन केले तर दैनंदिन व्यवहार पूर्णपणे खुले करणे योग्य ठरेल, असेही डॉ. जोशी म्हणाले.

तिसऱ्या लाटेत युवा पिढी म्हणजे २० ते ४० वर्षे वयोगटातील लोक जास्त बाधित होऊ शकतात.  साधारणपणे ३.५ टक्के लहान मुलांना करोनाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेता सुयोग्य पद्धतीने लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठीच लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ३० ते ४४ वर्षे वयोगटाला प्राधान्य दिले पाहिजे, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

केंद्र सरकारची सुरुवातीपासून लसीकरणाबाबात गोंधळ व धरसोड वृत्ती राहिली आहे. आपल्याकडे पुरेशा लशींचे उत्पादन होत नसतानाही आपण लशींची निर्यात केली. त्यांचे वाटप तसेच दरावरूनही केंद्राने गोंधळ घातला आहे. यातूनच भारत बायोटेकने दीडशे रुपयांत लशींचा पुरवठा करता येणार नाही, असे पत्रच केंद्राला दिले आहे. याबाबत डॉ. संजय ओक यांना विचारले असता, जास्तीतजास्त लसीकरण झाले पाहिजे तसेच घरोघरी जाऊन लसीकरण होणे गरजेचे असून त्याबाबत कृती दलाने यापूर्वीच सादरीकरण केले आहे. रेंगाळलेले लसीकरण तसेच लोकांकडून करोनाच्या नियमांचे योग्य पालन होत नसल्यामुळे तिसरी लाट नोव्हेंबर- डिसेंबरला नाही तर कदाचित ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच येईल असे डॉ. ओक म्हणाले.  शाळा सुरू करू नयेत तसेच उत्पन्न मिळविणाऱ्या पालकांचे जास्तीतजास्त लसीकरण करावे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.

आतापर्यंत २,६४,३९,००० नागरिकांना लस

राज्यात १५ जूनपर्यंत दोन कोटी ६४ लाख ३९ हजार ८२९ जणांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांपुढील लोकांचे लसीकरण अजूनही मोठ्या संख्येने होणे बाकी आहे.या वर्गातील लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेल्याची टक्केवारी ३९ टक्के एवढी आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सुमारे पाच कोटी ७१ लाख लोकसंख्या असून त्यांना १२ कोटी डोसेस लागणार आहेत. राज्य सरकारने लसीकरण करण्याची व्यवस्था केली असली तरी लस उपलब्धता व योग्य नियोजन हा मोठा विषय राहाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घरोघरी जाऊन लसीकरण होणे गरजेचे असून त्याबाबत कृती दलाने यापूर्वीच सादरीकरण केले आहे. रेंगाळलेले लसीकरण तसेच लोकांकडून करोनाच्या नियमांचे योग्य पालन होत नसल्यामुळे माझ्या मते तिसरी लाट नोव्हेंबर- डिसेंबरला नाही तर कदाचित ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच येईल.  – डॉ. संजय ओक, सदस्य, कृतिदल

तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे, संसर्ग दर कमी करणे तसेच गर्दी टाळणे, मुखपट्टी व सुरक्षित अंतर यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले.  – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कृतिदल

More Stories onकरोनाCorona
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus vaccine preference vaccination for 30 to 44 year olds akp
First published on: 18-06-2021 at 00:32 IST