मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसंच काही सुरक्षा रक्षक जे या चहावाल्याच्या स्टॉलवर गेले होते त्यांना पूर्वकाळजी म्हणून अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ कोरनाचा रुग्ण अढळून आल्याने भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्यातील सरकारच्या कारभारावरच उपहासात्मक टीका केली आहे.

मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असणाऱ्या परिसरामधील चहावाल्याला करोना झाल्याची वृत्त समोर आल्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सरकार उत्तम काम करतय. नाव ठेवायला जागाच ठेवली नाही. उद्या जाहीर करतील हा चहावाला त्याची किटली परदेशातून घेऊन आला होता पण आम्ही किटली सकट त्याला क्वारंटाइनमध्ये पाठवला,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.


नक्की वाचा >> “…तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतय”

कलानगर परिसर सील

सोमवारी संध्याकाळी वांद्रे येथील कलानगर परिसारात असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचे वृत्त मुंबई महापालिकेच्या हवाल्याने पीटीआयने दिले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्याऐवजी मातोश्रीमधून सर्व कारभार सांभाळत आहेत. त्यामुळेच करोनाचा रुग्ण अढळल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मातोश्री परिसरात महापालिकेकडून हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला असून तसे पोस्टर परिसरात लावण्यात आले आहेत.

मुंबईमधील वाढती संख्या

दरम्यान, मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत.