लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : गेल्या दोन महिन्यांत शहरानजीकच्या पर्यटनस्थळावरील हॉटेलना प्रतिसाद मिळत असताना शहरातील हॉटेलांत राहण्यास येण्याचे प्रमाण केवळ २० टक्केच आहे. प्रवासाच्या मर्यादित सुविधा, अत्यल्प व्यावसायिक दौरे, व्यावसायिक-व्यापारी प्रदर्शने बंद असणे अशा कारणांमुळे हॉटेलना प्रतिसाद कमी असल्याचे शहरातील हॉटेल चालकांनी सांगितले.

साडेतीन महिने बंद असलेल्या हॉटेलना जुलै महिन्यात मर्यादीत ग्राहकसंख्येसह परवानगी मिळाली. त्यानंतर दोन महिन्यांनी पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मुभा दिली. पाठोपाठ ई-पासचे र्निबध हटविल्यानंतर शहरानजीकच्या पर्यटनस्थळावरील हॉटेलना आठवडय़ाअखेरीस मोठा प्रतिसाद मिळू लागला. मात्र शहरातील हॉटेलचे गाडे अद्याप रुळावर आलेले नाही.

‘शहरातील हॉटेलचा बहुतांश भर हा व्यापार-व्यवसायांसाठी येणारे प्रवासी, तसेच काही ठिकाणी पर्यटक यांच्यावर असतो. सध्या या प्रवाशांचे प्रमाण जवळपास बंदच आहे. रेल्वे आणि विमानसुविधा मर्यादितआहेत, तर आंतरराष्ट्रीय प्रवासावर र्निबध आहेत. परिणामी शहरातील हॉटेलांना केवळ १५ ते २० टक्के च प्रतिसाद मिळत असल्याचे,’ फेडरेशन ऑफ हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष गुर्बक्षिशसिंग कोहली यांनी सांगितले. काही राज्यातील प्रवासावरील र्निबधामुळे ही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.  ‘सााधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या वार्षिक परिषदा, व्यापारी प्रदर्शनांची संख्या मोठी असते. मात्र अनेक कॉर्पोरेट कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत असून सध्या हे कार्यक्रम पूर्णपणे बंद असल्याचा फटका मोठा असल्याचे,’ विमानतळ परिसरातील जयश्री हॉटेलचे दिलीप दतवानी यांनी सांगितले. तसेच लग्न समारंभही अत्यंत मर्यादित स्वरुपात असल्याने त्यासाठी शहरातील हॉटेलचा खूपच कमी वापरला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मार्गदर्शक तत्वांबरोबरच ग्राहक-कर्मचारी कमीत कमी संपर्क व्हावा यासाठी आम्ही आपणहून अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. हॉटेलमधील काही खोल्यांचे रुपांतर जेवणाच्या खोलीत केले आहे. त्यामुळे मुख्य भोजनगृहात गर्दी  होणार नाही. मात्र ग्राहकांचा प्रतिसादच नसल्याचे,’ जुहू रेसिडन्सीचे सुजय शेट्टी यांनी सांगितले.

तग धरणे कठीण..

हॉटेल सुरू केल्यामुळे संचलनाचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे ग्राहक नसल्याने नुकसान होत असल्याचे मत काही हॉटेल चालकांनी मांडले. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाहेरुन शहरात येणाऱ्यांना विलगीकरणासाठी हॉटेलमध्ये सुविधा होती. सध्या असे विलगीकरण होत नसल्याने तो ग्राहकदेखील नसल्याचे हॉटेलचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान काही पंचतारांकित हॉटेले शहरातल्याचा रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी खर्चात अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली. त्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला, मात्र मध्यम व छोटय़ा हॉटेलना असे पर्याय नसल्याने त्यांनी तग धरणे कठीण असल्याचे, गुर्बक्षिशसिंग कोहली यांनी सांगितले.