राज्यातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येपैकी निम्मे रुग्ण मुंबईतील आहेत. या आकडेवारीनं मुंबई महापालिकेची चिंता वाढवलेली असतानाच आणखी एक नवं आव्हान महापालिकेसमोर उभं राहिलं आहे. मागील दोन दिवसात धारावीमध्ये तीन करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी (२ एप्रिल) एका सफाई कामगाराला करोना झाल्याचं समोर आलं होतं. आता एका ३५ वर्षीय डॉक्टर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं गुरुवारी निष्पन्न झालं होतं. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी असून, धारावीत तो कर्तव्यावर होता. करोना सदृश्य लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होतं. तपासणीनंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) धारावीत आणखी एक करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. एका ३५ वर्षीय डॉक्टरला करोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या डॉक्टरच्या कुटुंबीयांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, करोनाग्रस्त डॉक्टर राहत असलेली बिल्डिंग सील करण्यात आली असून, डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचं काम महापालिका अधिकाऱ्यांनी हाती घेतलं आहे.

धारावीत करोनाबाधिताचा मृत्यू –

धारावीमधील करोना रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. मुंबई महापालिकेने धारावीतील बालिका नगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील या रुग्णाला २३ मार्चपासून ताप येत होता. २६ मार्च रोजी त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, काहीच फरक न पडल्याने २९ मार्च रोजी त्याला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला करोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला.