मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत १,२५७ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची एकू ण संख्या दोन लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. शनिवारी  ५० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० हजार १६  झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या तुलनेत कमी होऊ लागली असून रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्य़ांवर तर रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी १२० दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण करोनारुग्णांची संख्या दोन लाख ५० हजार ६१ वर पोहोचली आहे. शनिवारी ८९८  रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत  दोन लाख १९ हजार १५२ जण करोनामुक्त झाले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ८७२ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ८७२ करोना रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २ लाख ६ हजार ३०६ वर पोहोचली. दिवसभरात १८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार २१४ झाली आहे. शनिवारी नोंदलेल्या रुग्णांत ठाणे शहरातील २१३, कल्याण-डोंबिवलीतील २०७, नवी मुंबईतील १६८, मीरा-भाईंदरमधील १०७, ठाणे ग्रामीणमधील ६६ जणांचा समावेश आहे.

राज्यात बाधितांच्या तुलनेत दीडपट रुग्ण बरे 

मुंबई : राज्यातील नवीन करोना रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत असून शनिवारी राज्यात ६,४१७ नवीन रुग्णांचे निदान झाले. तुलनेत दीडपट  म्हणजेच १०,००४  रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७८ टक्के  झाले आहे. राज्यात शनिवारी १३७  करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे.