लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिवाळीनंतर मुंबई शहरात पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या वाढत असताना कुल्र्यात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजण्याबरोबरच वाहतूक कोंडीलाही स्थानिकांना तोंड द्यावे लागत आहे. सायंकाळच्या सुमारास अनधिकृत फे रीवाल्यांमुळे आणि खरेदीकरिता जमणाऱ्यांमुळे रस्ते गर्दीने फु लून जातात. यात शारीरिक अंतर, मुखपट्टीचेही नियम फेरीवाल्यांसह सामान्य नागरिकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा मुंबई शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र दिवाळीमध्ये अनेक जण खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने पुन्हा एकदा शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुन्हा टाळेबंदीची शक्यता वर्तवली असून हे टाळण्यासाठी सर्वानी नियमांचे पालन करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र अनेक ठिकाणी शासनाचे हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

कुर्ला येथील नेहरूनगर ते ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात रोज सायंकाळी मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांमुळे या परिसरात सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी सामाजिक अंतराचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत, तर अनेक जण मुखपट्टी न लावताच फिरताना पाहायला मिळत आहेत. यामुळे या परिसरात करोनाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त आहे.

वाहतूक कोंडीत भर

अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कुर्ला रेल्वे स्थानक ते ठक्कर बाप्पा कॉलनीदरम्यान मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे. या कोंडीमुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.