लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : धारावी आणि आसपासच्या परिसरातील करोनाबाधित आणि संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन माहीमच्या नेचर पार्कच्या समोरील धारावी आगाराजवळील सार्वजनिक वाहनतळाच्या मोकळ्या जागेत २०० खाटांचे समर्पित करोना आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील सर्व खाटा प्राणवायूच्या सुविधेसह सज्ज करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील धारावी, दादर आणि माहीम परिसरात सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा मोठय़ा प्रमाणावर शोध घेण्यात येत आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या अती जोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटातील व्यक्तींची संख्या वाढत आहे. अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येत आहे. धारावीतील अशा संशयित व्यक्तींसाठी नेचर पार्कच्या समोरील सार्वजनिक वाहनतळाच्या खुल्या जागेत समर्पित करोना आरोग्य केंद्र  उभारण्यात आले आहे. या केंद्राची क्षमता २०० खाटांची असून प्रत्येक खाटेसाठी प्राणवायूची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्राणवायूची सुविधा असलेल्या ३० खाटा रुग्णांसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित खाटांना मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राणवायूची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे पालिका रुग्णांनी सांगितले.

या समर्पित करोना आरोग्य केंद्रासाठी १० डॉक्टर, सहा परिचारिका, २५ कक्ष परिचर (वॉर्डबॉय), तीन समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पाळीत तीन डॉक्टर, दोन परिचारिका, आठ कक्ष परिचर आणि एक समन्वयक काम करणार आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळा तज्ज्ञ, अन्य कामगार आदींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

अजय देवगणचा मदतीचा हात

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण धारावीकरांच्या मदतीला धावून आला आहे. धारावीतील करोना संशयितांसाठी उभारण्यात आलेल्या या समर्पित करोना आरोग्य केंद्रात प्राणवायूची सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी अजय देवगणने स्वीकारली आहे. त्याचबरोबर दोन व्हेंटिलेटरही त्याने उपलब्ध केले आहेत.