निकृष्ट सुविधा देऊनही ४ लाख १० हजारांचे बिल

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पालिका रुग्णालयांत रुग्णांची हेळसांड होते म्हणून खासगी रुग्णालयांची पायरी चढणाऱ्या रुग्णांना निकृष्ट सेवेबरोबरच आर्थिक भरुदडही सहन करावा लागत आहे.

मुंबईतील आग्रीपाडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सामाजिक काम करताना करोनाची लागण झाली. गेली ३२ वर्ष ही व्यक्ती नाना पालकर स्मृती समितीमध्ये रुग्णसेवक म्हणून कार्यरत आहे. सततच्या येणाऱ्या तापामुळे ७ मे रोजी त्यांनी केईम रुग्णालयात करोनाची चाचणी केली. ८ मे रोजी आलेला अहवाल सकारात्मक आला. जागेचा अभाव असल्याचे सांगत काही रुग्णालयांनी त्यांना प्रवेश दिला नाही. परंतु त्याच दिवशी नायर रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेत उपचार सुरू केले. येथे सुविधांचा अभाव होताच, पण माझ्या बाजूच्या खाटेवर काही तास एक मृतदेह पडून होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी १३ मे रोजी स्वत:ला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करून घेतले. परंतु तिथेही त्यांना असाच अनुभव आला.

‘ग्लोबलमध्ये तीन दिवस त्यांना चप्पल, टूथपेस्ट, टॉवेल कोणत्याही सुविधा पुरवल्या नाही. जेवणही निकृष्ट दर्जाचे होते. चहा कायम गारच असे. रुग्णांना औषधे देणारी व्यक्ती सगळीकडे एकच हातमोजे घालून वावरत असे. टॉवेल म्हणून उशांचे कव्हर दिले गेले,’ असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. शिवाय खोकला नसतानाही तीन वेळा एक्स-रे काढण्यात आले. करोनाचा अहवालही रुग्णापासून लपवण्यात आला. त्यांनतर २२ मे शेवटची चाचणी नकारात्मक आल्यानंतर घरी पाठवणार असल्याचे कळले. परंतु पुन्हा एक चाचणी करण्याचे सांगत रुग्णालयाने थांबवून घेतले. रुग्णालय विनाकारण पैसे उकळत असल्याचे लक्षात आल्याने मी तक्रोर करायला सुरुवात के ली, असे या रुग्णाने सांगितले. त्यानंतर मात्र तातडीने त्यांना घरी सोडण्यात आले. या निकृष्ट सेवेकरिता ४ लाख १० हजारांचे बिल आकारण्यात आल्याची तक्रोर रुग्णाने के ली आहे.

याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना विचारले असता, ‘बाधित रुग्ण मृत पावल्यानंतर त्याला नेईपर्यंत काहीसा वेळ लागतो. या संसर्गजन्य आजारात कापडी चादर न वापरता स्वच्छतेला पूरक असे प्लास्टिक कव्हर वापरले जाते. इथे रुग्णाची कधीही हेळसांड होत नाही. परंतु रुग्णांच्या तुलनेने डॉक्टर आणि कर्मचारी काहीसे कमी असल्याने रुग्णांनी थोडी समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. तर ‘ग्लोबल रुग्णालयात प्रत्येक रुग्णाची विशेष काळजी घेतली जाते. सध्या करोना रुग्णांचा ताण असला तरी प्रत्येक रुग्णाला आम्ही उत्तम सुविधा पुरवतो. म्हणूनच तो रुग्ण दहा दिवसांत बरा होऊन घरी परतला. त्यामुळे संबंधित रुग्णाने केलेले आरोप खोटे आहे.’ असे ग्लोबल रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

अधिकचा भरुदड

अतिदक्षता विभागाचे दर प्रतिदिन ७ हजार ५०० असूनही ८ हजार आकारात १० दिवसांचे ८८ हजार लावण्यात आले आहेत. तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांचे २२०० रुपये रोज प्रमाणे ८६ हजार असतानाही पुन्हा अधिकचे १५ हजार लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे रक्त, लघवी, ईसीजी या चाचण्या अतिदक्षता विभागासाठी आकारलेल्या रकमेतच समाविष्ट असतात. परंतु याचेही ३५ हजार ९६८ रुपये आकारण्यात आले आहेत. वैद्यकीय साधनांसाठी ४६ हजार ४०० तर औषधे आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांचे (ग्लोज, पीपीई, फेस शिल्ड, डोक्याची टोपी) १ लाख ३९ हजार देयकात नमूद करण्यात आले आहे.