रेल्वे स्थानकाजवळच्या एटीएममधून पैसे काढून परतणाऱ्या नागरिकांना थोडय़ा वेळातच त्यांच्या खात्यातून परस्पर भली मोठी रक्कम काढण्यात आल्याचे संदेश येत होते. विशेष म्हणजे, मुंबईच्या पश्चिम उपनगरांत वेगवेगळय़ा स्थानकांत घडणाऱ्या या घटना एकाच बँकेच्या एटीएम केंद्रात घडत होत्या. त्यामुळे आरोपींना तातडीने शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.

गेल्या महिन्यात एका ख्यातनाम बँकेच्या प्रतिनिधीने मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना यांची भेट घेतली. दादर ते भाईंदपर्यंतच्या पश्चिम उपनगरांतल्या रेल्वे स्थानकांशेजारील बँकेच्या एटीएम केंद्रात फसवणुकीचे तब्बल १६ प्रकार घडलेत.. प्रतिनिधी सक्सेनांसमोर तक्रार करत होता. बँक ग्राहकाच्या खात्यातून एटीएम कार्डाद्वारे भलत्यांनीच परस्पर पैसे काढले. प्रत्येक ग्राहकाच्या खात्यातून साधारणपणे ५० ते ८० हजार रुपये काढण्यात आले. हे प्रकार असेच सुरू राहिल्यास ग्राहकांसोबत बँकेला भुर्दंड, ग्राहकांचा विश्वास कमी होण्याची भीती या शक्यतेने प्रतिनिधी काकुळतीला आला होता. सक्सेना यांनी या प्रकरणाचा तपास कांदिवली कक्षाकडे सोपवला.

ऑनलाइनच्या जमान्यात फोनवरून तपशील घेऊन, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्लोन करून अशा प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. हे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, साहाय्यक निरीक्षक शरद झिने, शेषराव शेळके, हवालदार शिवाजी दहिफळे, नाईक संतोष माने या पथकाने तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम दादर ते भाईंदरदरम्यान ज्या एटीएम केंद्रांमधून ज्या ग्राहकांची फसवणूक घडली त्या सर्वाकडे विचारपूस केली. तेव्हा प्रत्येक जण रेल्वे स्थानकाशेजारील एटीएम केंद्रात रात्रीच्या वेळेत पैसे काढण्यासाठी गेला, तेथील सुरक्षारक्षकाने एटीएम यंत्र बंद असल्याचे सांगितल्याने शेजारील यंत्रावरून पैसे काढून बाहेर पडला, घरी पोहोचेपर्यंत त्याच्या खात्यातून आणखी ५० ते ८० हजार रुपये काढल्याचा लघुसंदेश बँकेकडून पाठवण्यात आला, खातरजमा केल्यावर खरोखरच आपल्या खात्यातून अतिरिक्त रक्कम काढल्याची माहिती प्रत्येकाला मिळाली. हा सामाईक धागा पकडून गुन्हे शाखेच्या पथकाने त्या प्रत्येक एटीएम केंद्राला भेट दिली, तेथील नेमके सीसीटीव्ही चित्रण मिळवले. भेट दिल्यावर गुन्हा घडलेले प्रत्येक एटीएम केंद्र रेल्वे स्थानकाला लागून आहे, एकाच केंद्रात दोन यंत्रे आहेत तसेच रात्रीच्या वेळेत येथे सुरक्षारक्षक नसतो ही तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती पथकाच्या हाती लागली. सीसीटीव्ही चित्रणाने तर पथकाला थेट आरोपींपर्यंतच नेऊन ठेवले.

हे यंत्र बंद आहे तुम्ही दुसऱ्या यंत्राचा वापर करा हे ग्राहकाला सांगणारा सुरक्षारक्षक नव्हताच. प्रत्यक्षात तो गुन्हे करणाऱ्या टोळीचा साथीदार होता. सीसीटीव्ही चित्रण बारकाईने पाहिल्यावर टोळीच्या गुन्ह्याची पद्धत पथकाच्या लक्षात आली. एटीएम केंद्रात आलेल्या ग्राहकाने कार्ड यंत्रात ढकलून व्यवहार सुरू केल्यावर त्याला हटकायचे. यंत्र बंद असल्याची थाप मारून दुसऱ्या यंत्रावर जाण्यास भाग पाडायचे. यादरम्यान सुरक्षारक्षकाप्रमाणे भासणाऱ्या आरोपीची जबाबदारी ही की, ग्राहक दुसऱ्या यंत्राकडे वळण्याआधी त्याने आधीच्या यंत्रावर सुरू केलेला व्यवहार रद्द होणार नाही याची खबरदारी घेणे. यासाठी हा आरोपी यंत्र बंद असल्याची थाप मारल्यानंतर स्वत:च यंत्रावरील कॅन्सलऐवजी करेक्शन बटण दाबे. घाईत असलेला ग्राहक दुसऱ्या यंत्रावरून पैसे काढून केंद्राबाहेर पडेपर्यंत हा आरोपी व्यवहार रद्द होणार नाही याची काळजी घेई. त्यासोबत अन्य आरोपी ग्राहकाकडून अन्य यंत्रावरून व्यवहार सुरू असताना त्याचा चार अंकी पिन नंबर बघून ठेवत. ग्राहक बाहेर पडला की आधीच्या यंत्राला तोच पिन नंबर देऊन अर्धवट व्यवहार पुढे सुरू ठेवत आणि पैसे काढून पसार होत.

सर्व एटीएम केंद्रांमध्ये सीसीटीव्ही चित्रणात टोळीतील दोन आरोपींचे चेहरे पथकाला स्पष्टपणे दिसत होते. त्यांना पकडण्यासाठी त्यांचे नाव, ठावठिकाणा, मोबाइल नंबर या तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या; ज्या पथकाकडे नव्हत्या. खबऱ्यांकडेही या दोघांची माहिती उपलब्ध नव्हती. अशात पथकाने तांत्रिक तपास करून मोठय़ा मुश्किलीने यातल्या एकाचा मोबाइल नंबर मिळवलाच. त्यानंतर गोरेगाव, मीरा रोड पथकाने पिंजून काढले. मात्र आरोपी सापडत नव्हता. अखेर शक्कल लढवून पथकाने भूपेंद्र मिश्रा आणि सत्येंद्र मिश्रा या दोन आरोपींना मीरा रोडमधून ताब्यात घेतले. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक भासणारा सत्येंद्र. तो पूर्वी एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत असे. त्यामुळे त्याला केंद्रात येणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेची जाणीव होती. तसेच संबंधित बँकेच्या एटीएम यंत्रांच्या हाताळणीबाबतही ज्ञान होते. तर भूपेंद्र भोजपुरी चित्रपटांमधला ज्युनिअर आर्टिस्ट  आहे. विशेष बाब म्हणजे टोळीतील तिसरा आरोपी या दोघांचा सख्खा तर चौथा आरोपी चुलतभाऊ आहे.

अटकेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरील एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली.  पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. बेताचे शिक्षण असले किंवा अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती नसली तरी ग्राहकांची मानसिकता, निर्माण केलेला आभास आणि हातचलाखीतून या चौघांनी गुन्हय़ांची मालिका घडवली.

एटीएममधून पैसे काढताना..

पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्राचाच वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रकरण आदर्श ठरू शकेल. कितीही घाई असली तरी सुरक्षारक्षक नसलेल्या केंद्रातून व्यवहार टाळावेत. व्यवहार सुरू असताना विनाकारण केंद्रात अन्य व्यक्ती आल्यास सावध व्हावे, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, कॅन्सल बटणाचा उपयोग करून व्यवहार रद्द केल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नये. एटीएम केंद्रात वातानुकूलित यंत्राबाबत बँका जितक्या गांभीर्याने विचार करतात तितकाच सुरक्षारक्षक नेमण्याबाबत किंवा यंत्र बंद असल्यास तसा फलक लावण्याबाबतही करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.