मार्च २०१७. रात्रीचं जेवण आटोपून मोनिका (१९) झोपण्याची तयारी करत होती. बेडवर पडून सवयीप्रमाणे तिने मोबाइल हातात घेतला. खूप सारे नोटिफिकेशन्स आले होते. मोठय़ा उत्सुकतेने तिने ते उघडून पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला दरदरून घाम सुटला. आपण मोबाइलमध्ये काय बघतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिची अनावृत अवस्थेतील एकामागोमाग एक छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर आलेली होती. अज्ञात मोबाइल क्रमांकावरून ही छायाचित्रे आली होती. काय करावे तिला सुचत नव्हते. हे भीषण स्वप्न तर नाही ना, असे तिला वाटू लागले.

पण काही वेळाने ती लगेच भानावर आली. ही असल्या अवस्थेतील छायाचित्रे माझी नाहीत हे कळून चुकले. कुणीतरी मोनिकाचा चेहरा अश्लील छायाचित्रांना जोडून विकृत छायाचित्र तयार केले होते. कुणी हे छायाचित्र पाठवले असेल? माझे अश्लील छायाचित्र मलाच का पाठवले? ती विचार करत होती. पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरून तिला अशाच प्रकारची छायाचित्रे आणि संदेश येऊ  लागले. काय करायचे.? कुणाला सांगायचे? तिला काही सुचेनासे झाले, तरी तिने मोठय़ा हिमतीने ज्या क्रमांकावरून संदेश आले, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाइल बंद होते. तब्बल ११ वेगवेगळ्या क्रमांकांवरून तिला अशी छायाचित्रे आली होती. हा प्रकार तिला काही कळत नव्हता. ती रात्र तिने तळमळून काढली.

नालासोपाऱ्यात राहणारी मोनिका महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करत होती. सकाळी उठल्यावर रात्रीच्या भयंकर प्रकाराने तिच्या अंगावर शहारे उठले. हे एक भयंकर स्वप्न असावे असे तिला वाटू लागले. पण मोनिकाच्या अडचणी संपल्या नव्हत्या. तिच्याबाबत अजून भयानक प्रकार घडलेला होता. मोनिकाला तिच्या मित्राचा फोन आला तिला अश्लील छायाचित्रे पॉर्नसाइटवर असल्याची माहिती त्याने दिली. यामुळे मोनिका पुरती कोसळली. तिने तुळिंज पोलीस ठाणे गाठले.

ही अश्लील छायाचित्रे मोनिकाची नाहीत याची पोलिसांना खात्री पटली. तिच्या जवळच्याच कुणीतरी तिला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केल्याचे तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या लक्षात आले. मोनिकाला ज्या क्रमांकावरून हे संदेश आले होते, त्या व्यक्तींशी पोलिसांनी संपर्क केला. त्या सर्वाना चौकशीसाठी तुळिंज पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. ते सगळे धुळे, जळगाव या भागातील होते. ते मोनिकाला ओळखत नव्हते की मोनिका त्यांना ओळखत नव्हती. पण त्यांच्या मोबाइलमधूनच ही अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठविण्यात आले होते. पण कसे.? पोलिसांना काही दुवा मिळत नव्हता. मोनिकाचे छायाचित्र अश्लील संकेतस्थळावर टाकले जाणे, अनोळखी क्रमांकावरून तिला अश्लील संदेश जाणे यांचा काहीतरी संबंध असायला हवा, असे पोलिसांना वाटू लागले. संकेतस्थळावरील छायाचित्र आणि मोनिकाच्या व्हॉटस अ‍ॅपवर आलेले छायाचित्र सारखे होते. इथूनच दुवा मिळेल असे पोलिसांना वाटू लागले.

पोलिसांनी मोनिकाकडे चौकशी सुरू  केली. तिला कुणी प्रियकर आहे का याची विचारणा केली. सुरुवातीला खाजगी जीवनाबद्दल बोलण्यास मोनिकाला संकोच येत  होता. पण नंतर तिने फेसबुकवर जळगावमधील एका तरुणाशी ओळख झाल्याचे सांगितले. गजेंद्र पाटील (३०) असे त्या तरुणाचे नाव होते. गजेंद्रचे लग्न ठरल्याने मोनिकाने त्याच्याशी संबंध तोडले होते. वर्षभरापासून त्यांची ओळख होती. तो तीन वेळा मुंबईतही तिला भेटायला आला होता. लग्न ठरले तरी माझ्याशी संबंध ठेव, असे तो तिला सांगत होता. गजेंद्रने सुरुवातीला श्रीमंत असल्याचे तिला सांगितले होते. प्रत्यक्षात तो बेरोजगार असल्याचे मोनिकाला समजले. त्यातच मे महिन्यात गजेंद्रचे लग्न ठरले होते. त्यामुळे मोनिकाने त्याच्याशी फारकत घेतली. बोलताना मोनिकाने गजेंद्रला मोबाइल दुरुस्तीचे चांगले ज्ञान असल्याचे पोलिसांना सांगितले. मोनिकाने गजेंद्रशी तोडलेले संबंध आणि त्याला मोबाइल दुरुस्तीचे असलेले ज्ञान हाच दुवा पोलिसांनी पकडला. ज्या ११ क्रमांकांवरून अश्लील छायाचित्रे पाठवण्यात आली होती, तेसुद्धा या परिसरातील होते. सगळी लिंक जुळत होती. त्या ११ जणांनी आपले मोबाइल दुरुस्तीसाठी गजेंद्रकडे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना एवढी माहिती पुरेसी होती. त्यांनी गजेंद्रच्या मुसक्या आवळल्या. मोनिकाने संबंध तोडले म्हणून बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

अश्लील छायाचित्रे अशी बनवली..

गुगल प्ले स्टोरवरून गजेंद्रने एक अ‍ॅप डाऊनलोड केले. या अ‍ॅपमध्ये कुणाचेही छायाचित्र कुणालाही जोडता येते. त्याचा गैरफायदा उचलत गजेंद्रने नग्न तरुणीच्या छायाचित्राला मोनिकाचे छायाचित्र जोडले. ज्यांचे मोबाइल दुरुस्तीसाठी आले होते. व्हॉटस अ‍ॅपवर चेंज नंबर नावाचे ऑप्शन असते. त्यात जाऊन त्याने या अकरा जणांचे क्रमांक एकापाठोपाठ एक टाकायला सुरुवात केली. जो क्रमांक टाकला, त्या क्रमांकाच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येतो. हे ११ मोबाइल गजेंद्रकडेच असल्याने त्या मोबाइलवर आलेले पासवर्ड त्याने टाकले आणि क्रमांक चेंज केले. त्याच्या मोबाइलच्या व्हॉटस अ‍ॅपला दुसरे क्रमांक अ‍ॅक्टिवेट झाले होते. त्या दुसऱ्या क्रमांकांवरून त्याने ही छायाचित्रे पाठवायला सुरुवात केली. याशिवाय एक छायाचित्र अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले. पोलिसांनी गजेंद्रवर गुन्हा दाखल करून अटक केली.

( फिर्यादी आणि आरोपींची नावे बदललेली आहेत.)

सुहास बिऱ्हाडे @suhas_news