अपघात टाळण्यासाठी नियोजन; रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांचा समावेश

 मुंबई : पावसाळ्यात रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होऊन कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मध्य रेल्वेकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेकडून बुधवारी चार स्थानकांत या संदर्भात रंगीत तालीम केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू आणि ३५ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. यात स्थानकात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिसांबरोबर रेल्वेच्या अन्य कर्मचाऱ्यांकडून तातडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागल्याने पश्चिम रेल्वेला टीकेला सामोरे जावे लागले होते. ही घटना घडण्यापूर्वी त्या वेळी झालेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर एकच गर्दी केली होती.

यंदा पावसाळ्यात स्थानकात अशा प्रकारे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मध्य रेल्वेकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे. गर्दी व्यवस्थापनाची रंगीत तालीम बुधवारी केली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने चार गर्दीच्या स्थानकांची निवड केली असून यामध्ये चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस, स्टेशन मास्तर इत्यादी कर्मचारी या व्यवस्थापनात सहभागी होतील. सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान चार स्थानकांत व्यवस्थापनाची तालीम होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

पादचारी पूल किंवा फलाटांवर गर्दी झाल्यास ती कशी हाताळावी, महिला आणि वृद्ध तसेच लहान मुलांना स्थानकात येण्या-जाण्यासाठी मार्ग कसा करून द्यावा, रेल्वे पोलिसांसह, रेल्वेतील अन्य कर्मचाऱ्यांची त्या वेळी जबाबदारी नेमकी काय असेल, इत्यादी माहिती व्यवस्थापनाच्या तालमीत दिली जाणार आहे.

प्रवाशांसाठी उपाययोजना

चार स्थानकांत व्यवस्थापनाची तालीम झाल्यानंतर कुर्ला, घाटकोपर यांसह आणखी काही स्थानकांत रंगीत तालीम होणार असल्याचे सांगण्यात आले.  मध्य रेल्वेने सात स्थानकांना लागूनच प्रवाशांना थांबण्यासाठी २५० चौरस फुटांचे आसरे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. करी रोड, कुर्ला, नाहूर, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा स्थानके यात आहेत.