करोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शनिवार-रविवारी लागू करण्यात आलेल्या संपूर्ण संचारबंदी काळात तुटवडा जाणवू नये म्हणून मुंबईकर आणि उपनगरांतील नागरिकांनी शुक्रवारी रात्री ८ वाजण्यपूर्वी गरजेच्या जिन्नसांची जोरदार खरेदी केली.

दोन दिवसांत अंडी, कोंबड्या आणि मासळीचा पुरवठा कमी पडू नये म्हणून मांसाहारी खवय्यांंनी या वस्तूंची सर्वाधिक खरेदी केली. बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी कठोर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शुक्रवारी खरेदीसाठी उडालेली झुंबड करोना प्रसार रोखण्याच्या मूळ उद्देशांचाच विसर पाडणारी होती. दादर, परळ, धारावी, भायखळा आदी मुंबईतील प्रमुख ठिकाणांसह उपनगरातील वांद्रे, अंधेरी, बोरिवली, दहिसर येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये नागरिक दोन दिवसांच्या चिंतेने अधिक खरेदी करताना दिसत होते. सकाळी बाजारपेठा रिकाम्या होत्या; परंतु दुपारनंतर रस्त्यांवर नागरिकांची रीघ लागली.

मांसवारासाठी खरेदी…

रविवार हा मांसाहारप्रेमींसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्या दिवशी सर्वच दुकाने बंद राहणार असल्याच्या समजातून अनेकांनी रविवारची तजवीज शुक्रवारीच केली. स्थानिक बाजारपेठेत प्रत्येक कोंबडी- मटण विक्रेत्यांपुढे ग्राहकांचा घोळका होता.

‘शुक्रवारी सकाळपासूनच ग्राहक येत होते. संध्याकाळी कामावरून परतणाऱ्यांमुळे गर्दी आणखी वाढली’ अशी माहिती कुल्र्यातील चिकन, मटण विक्रेत्याने दिली.

विसर…

स्थानिक बाजारपेठांमध्ये अंतरनियम, मुखपट्टीची सक्ती हे सगळे नियम नागरिक विसरल्याचे चित्र होते. काही बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेल्या दुकानदारांनीही अर्धे दार खुले करून ग्राहकांना खरेदीची वाट करून दिली.

तासाभरात वस्तूंचा फडशा…

भाज्यांपेक्षाही कांदे, बटाटे आणि कोथिंबीर, आले, लसूण, लिंबू आदी मसाल्याच्या जिन्नसांवर ग्राहक तुटून पडले होते. बहुतांश दूध विक्रेत्यांची दुकाने तासाभरातच रिकामी झाली. बिस्कीट, पाव, ब्रेड खरेदीसाठीही खाद्यपदार्थांच्या दुकानाबाहेर गर्दी पाहायला मिळाली. ‘शुक्रवारी ग्राहकांची गर्दी होणार याचा  अंदाज बांधूनच अधिकचे दूध आणि ब्रेड मागवण्यात आले होते, पण तेही तात्काळ संपले. दोन दिवस दुकाने बंद असल्याने एक लिटर दूध घेणारी व्यक्ती दोन लिटर दूध घेऊन गेली,’ अशी माहिती दूधविक्रेत्यांनी दिली.

कल्याण-डोंबिवलीत खाद्यपदार्थ विक्रेते, खासगी आस्थापनांना सोमवार ते शुक्रवार मुभा

कल्याण: राज्य शासनाच्या आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर भाजी, फळे विक्री, खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेते, वकील, सनदी लेखापाल या खासगी आस्थापनांना  सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून व्यवसाय, व्यवहार करण्यास मुभा दिली आहे. आजपासून सोमवारपर्यंतचा टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर पुढील आठवड्यात या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या परीक्षा देणारे विद्यार्थी, उमेदवारांना प्रवास करताना प्रवेश पावती जवळ ठेवणे आवश्यक आहे. घरपोच अन्न, खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या सर्व संस्थांना २४ तास घरपोच सेवा देण्याची मुभा असेल. उपाहारगृहातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना उपाहारगृहात जाऊन खाद्य पदार्थ खरेदीस मज्जाव करण्यात आला आहे.