गतवर्षीच्या तुलनेत अकरावी प्रवेशाच्या गुणमर्यादेत दोन टक्क्यांपर्यंत घसरण

दहावीला ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविणाऱ्यांची रोडावलेली संख्या आणि अल्पसंख्याक कोटय़ाअंतर्गत संस्थास्तरावरील कमी झालेले प्रवेश यामुळे अकरावीच्या मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महाविद्यालयांच्या पहिल्या जागावाटप यादीचा कटऑफ यंदा अपेक्षेप्रमाणे खाली आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वसाधारण महाविद्यालयांमध्ये तो सरासरी १ ते २ टक्क्यांनी घसरला आहे. तर अल्पसंख्याक महाविद्यालयांचा कटऑफ सरासरी ५ ते ६ टक्क्यांनी कमी झाला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली जागावाटप यादी अखेर सोमवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या २,३६,१४३ विद्यार्थ्यांपैकी १,५६,५०७ विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेशफेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. एकूण ५३,८०३ विद्यार्थ्यांना पहिला पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यावर्षी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असल्यामुळे ही मुले आता प्रवेशफेरीमधून बाहेर पडणार आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ८,६४५ ने कमी झाले आहे. याचा चांगलाच परिणाम पहिला गुणवत्ता यादीवर झाला आहे. त्यातही अल्पसंख्यांक महविद्यालयांचे कटऑफ लक्षणीयरीत्या घसरल्याचे दिसून येत आहे. या वर्षीच्या सुधारित नियमानुसार, अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश घेता येणार नाही. यामुळे अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत एक हजाराने कमी झाली आहे. मागील वर्षी अल्पसंख्यांक कोटय़ामधून २० हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होता. तर यंदा या कोटय़ातील विद्यार्थ्यांची कमी होऊन संख्या १९,५७४ इतकी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्यांची संख्याही जवळपास १३ हजाराने वाढली आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळेही कटऑफ घसरल्याचा अंदाज आहे.

mv01

पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेले विद्यार्थी

* पहिल्या पसंतीचे महाविद्यालय – ५३,८०३

* दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – २५,९५०

* तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – १८,२९२

* चौथ्या पसंतीचे महाविद्यालय – १४३१२

* पाचव्या पसंतीचे महाविद्यालय – ११८८७

* प्रवेश न मिळालेले विद्यार्थी – ४७,१६९

* संस्थास्तरावरील कोटय़ामधून आतापर्यंत झालेले प्रवेश – एकूण ३२,४७७

* अल्पसंख्याक कोटा- १९,५७४

* इनहाऊस कोटा – ११,२९९

* व्यवस्थापन कोटा – १५३१

* द्विलक्षी अभ्यासक्रम – ७३

..तर प्रवेश निश्चिती करू नये

सुधारित नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांनी एकदा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला की त्याचे नाव प्रवेशफेरीतून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल, अशी खात्री असेल तरच पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ नये. आपल्या गुणवत्ता, या यादीचे कटऑफ आणि रिक्त जागा याचा सर्वागीण विचार करून विद्यार्थ्यांनी आपला आपला पसंतीक्रम बदलावा.

एकदा संस्थास्तरावर प्रवेश निश्चित केल्यानंतर सर्वसाधारण प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याने या वर्षी अल्पसंख्याक वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांनी खुल्या वर्गातून अर्ज केले आहेत. आमच्याकडे गतवर्षीपेक्षा विज्ञान शाखेसाठी अल्पसंख्याक कोटय़ातून प्रवेश घेण्यासाठी कमी विद्यार्थी आले होते. त्यामुळे यंदा ‘कट ऑफ’ घसरण्याचे हेही एक कारण असू शकते.

– राजपाल हांडे,प्राचार्य, मिठीबाई महाविद्यालाय