सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या मंडळांनी ध्वनिक्षेपकांबाबतचे नियम मोडले

ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटात झाकोळलेले दहीहंडीचे मनोरे या वेळी शांततेत उठून दिसले. मुंबई व ठाण्यात काही ठिकाणचा अपवाद वगळता दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. मात्र वांद्रे येथे सत्ताधारी भाजपच्या दहीहंडीत आणि ठाण्यात सेनेच्या टेंभीनाक्यावरील दहीहंडीत ध्वनिक्षेपकांवर मोठमोठय़ाने गाणी लावत निर्णय धुडकावला गेला.

दरवर्षी ध्वनिक्षेपकांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचले जात. मात्र या वेळी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत शहरातील ध्वनी व प्रकाश व्यावसायिक संघटनेने दहीहंडीला ‘आवाज’ देण्याचे नाकारले आणि मुंबईतील बहुतांशी गोविंदा पथकांची वाटचाल शांततेत पार पडली. आवाज फाऊंडेशनकडून घेण्यात आलेल्या नोंदींमध्ये सेना भवन, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, दादर स्टेशन, जांबोरी मैदान, वरळी नाका या दहीहंडीच्या प्रमुख ठिकाणी ध्वनिक्षेपक लावले नसल्याचे स्पष्ट झाले. वाहतूक, लोकांची गर्दी, शिट्टय़ा यामुळे या ठिकाणी आवाजाची पातळी ८० डेसिबलपर्यंत वाढली होती. मात्र दरवर्षीपेक्षा या सर्व ठिकाणी कार्यक्रम शांततेत पार पडला. याला अपवाद ठरला, तो वांद्रे येथील हिल रोडवरील मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी आयोजित केलेला दहीहंडीचा कार्यक्रम. वांद्रे पोलीस स्टेशनजवळच असलेल्या या दहीहंडीच्या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी ध्वनिक्षेपकांचा आवाज टिपेला पोहोचला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथे तब्बल ११३.२ डेसिबल आवाज होता, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी दिली.

  • ध्वनिप्रदूषणाच्या नियमानुसार निवासी ठिकाणी ५५ डेसिबल तर शांतता क्षेत्रात ५० डेसिबल मर्यादा आहे.
  • ठाण्यातही भगवती शाळा, जांभळी नाका, सरस्वती वर्तक नगर येथे ध्वनिक्षेपकांपासून गोविंदा व बघ्यांचीही सुटका झाली होती. मात्र टेंभी नाका येथील शिवसेनेच्या राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत मात्र ध्वनिक्षेपकांचा आवाज घुमला.
  • चिटणीस रुग्णालय हे शांतता क्षेत्र असूनही ध्वनिक्षेपकांवर गाणी सुरू होती.

मुंबईकरांचा उत्साह

  • स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्याने मुंबईत दहीहंडीच्या उत्सवाला नेहमीपेक्षा थोडी उशिरानेच सुरुवात झाली. एरव्ही नऊच्या सुमारास दहीहंडी फोडण्यासाठी ठिकठिकाणी हजेरी लावणारे गोविंदा पथक यंदा बाराच्या सुमारास जमू लागले. दादरच्या छबिलदास गल्ली आणि रानडे रोडवरील हंडय़ा दर वर्षीच सकाळी दहाच्या सुमारास फोडल्या जातात. त्यामुळे इथे मात्र काही गोविंदा पथकांनी सकाळी नऊ वाजताच हजेरी लावली होती.
  • सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने गोविंदाचा उत्साह द्विगुणित झाला होता. जीवादेवाशी निवासी मित्र मंडळाने आयोजित केलेली हंडी फोडण्यासाठी जोगेश्वरीतील युवा जिद्दी मराठा, कोकण नगर गोविंदा पथक, हिंदू एकता आणि अखिल या पथकांनी सकाळी नऊ वाजताच उपस्थिती लावली होती. स्वातंत्र्य दिन असल्याने या पथकांनी सुरुवातीला राष्ट्रगीत गाऊन देशाला मानवंदना दिली. त्यानंतर चारही पथकांच्या काही गोविंदांनी मिळून तीन थर लावले. या वेळी तिसऱ्या थरावरील गोविंदाने वीर नीलेश सावंत याचे छायाचित्र हातात घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
  • यानंतर हिंदू एकता पथकाने गाऱ्हाणे घालून दहीहंडीची पूजा केली आणि सहा थर लावून हंडी फोडली. ‘‘उच्च न्यायालयाने अटीमध्ये शिथिलता आणल्याने जीवादेवाशी निवासी मित्र मंडळाने या वर्षी वर्गणी गोळा केली नाही. आयोजकांनी स्वत:च्या खिशातूनच गोविंदांना मानधन दिले,’’ असे आयोजक शैलेश सरदार यांनी सांगितले.
  • शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये मोठा उत्साह होता. या ठिकाणी बालगोविंदांसाठी हार्नेसची सुविधा करण्यात आली होती. तसेच गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी पाण्याचे फवारे लावण्यात आले होते. दादर फुलबाजारात मनसेचे शाखाध्यक्ष अभिषेक गुप्ता यांनीदेखील दहीहंडीचे आयोजन केले होते. डीजे वाजविणाऱ्या व्यावसायिकांनी मूक दिन पाळल्याने गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांकडून बँजो पथकाला आमंत्रित करण्यात आले होते. आयडीयलच्या गल्लीमध्ये खास महिलांसाठी आयोजित केलेली दहीहंडी फोडण्याचा मान नयन फाऊंडेशनच्या अंध मुलींना तीन थर लावत मिळवला. तसेच या हंडीसाठी उपस्थित असलेल्या ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेतील स्त्री कलाकारांनीदेखील त्यानंतर ही हंडी फोडली. बोरिवलीत मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी सुमारे १२५ लहानमोठय़ा गोविंदा पथकांनी व १० महिला गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती.
  • स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी फुगे व फुलांच्या माळा, छोटे झेंडे यांचा वापर करत दहीहंडीचे सुशोभन करण्यात आले होते. गोविंदांच्या रस्तोरस्ती फिरणाऱ्या दुचाकींवर भगव्या झेंडय़ासोबत तिरंगाही लावण्यात आले होते. सेनाभवन, वरळी, प्रभादेवी या परिसरांत सकाळच्या वेळेत शुकशुकाट होता, कारण बडय़ा आयोजकांनी या भागात दुपारनंतर दहीहंडीचे आयोजन केले होते. आयोजकांनी डीजे नसल्याने उत्सवामध्ये उत्साह नसल्याचे नमूद केले असले तरी मुंबईकरांनी मात्र मोठय़ा आनंदात दहीहंडी साजरी केली.