अंधेरी स्थानक व मेट्रोला उन्नत ‘डेक’ने जोडणार

मुंबई : कल्याणमार्गे बाहेरगावी ये-जा करणाऱ्या मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ांमुळे उपनगरी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडेही सादर के ला आहे. अंधेरी स्थानकातही प्रवासी सुविधांची भर घालताना हे स्थानक मेट्रोला जोडण्यासाठी उन्नत ‘डेक’ तयार के ला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानक कायम प्रवाशांच्या गर्दीमुळे गजबजलेले असते. एकू ण सात फलाट असलेल्या कल्याण स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांनाही थांबा आहे. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची वाढलेली गर्दी, स्थानकातील अपुऱ्या पडणाऱ्या सुविधा पाहता त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वे व आयआरएसडीसीने घेतला आहे. या स्थानकाच्या विकासाचा प्रस्ताव तयार करून तो मध्य रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार स्थानकातील चार, पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या फलाटावरून लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा जातात. जवळपास १४० ते १५० गाडय़ा अप-डाऊन करताना कल्याण स्थानकात थांबतात. या स्थानकातून जाताना मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका नसल्याने लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे याच स्थानकात मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका, फलाट उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय कल्याण स्थानकाची रचना पाहता त्यातही काहीसे बदल करून सोयी-सुविधांची भर घालण्यात येणार आहे.

अंधेरीचाही पुनर्विकास

कल्याणबरोबरच अंधेरी स्थानकाचाही पुनर्विकास पश्चिम रेल्वेच्या मदतीने के ला जाणार आहे. अंधेरी स्थानकाच्या पश्चिमेला एका पादचारी पुलाच्या माध्यमाने मेट्रो स्थानकाला जोडण्यात आले आहे. मात्र या पुलावरून जाताना प्रवाशांना वळसा घालून जावे लागते. यातून सुटका करण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानक व मेट्रो स्थानक थेट उन्नत ‘डेक’ने जोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

अन्य सुविधांची उभारणी

कल्याण व अंधेरी या दोन्ही स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानकात अपंगस्नेही सुविधा उपलब्ध करणे, फू ड मॉल, खरेदीची सुविधा यासह प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे ही उद्दिष्टे आहेत.