अतिदक्षता विभागात दाखल रुग्णावर बलात्कार केल्याप्रकरणी ठाणे येथील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा शनिवारी उच्च न्यायालयानेही कायम केली.
डॉ. विशाल वारणे (२९) असे या डॉक्टरचे नाव आहे. पीडित रुग्णाने दिलेला जबाब आणि वैद्यकीय अहवाल यात काही विसंगती असल्या तरी डॉक्टरने केलेले कृत्य बलात्काराच्या व्याख्येत बसत असल्याचा सरकारी वकिलांचा दावा न्यायालयाने मान्य केला व वारणेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
चक्कर आल्याच्या तक्रारीनंतर या पीडित महिलेला २८ जानेवारी २०१३ रोजी ठाणे येथील ‘लोटस’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. याच रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेला वारणे याला त्या दिवशी रात्रपाळी होती. अतिदक्षता विभागात ठेवताना पीडित महिलेला इंजेक्शन देण्यात आल्याने ती निद्रावस्थेत होती. याचाच गैरफायदा वारणेने घेतला व अतिदक्षता विभागात कोणीही नसताना या महिलेवर बलात्कार केला. इंजेक्शनच्या प्रभावामुळे तिला काहीच करता येत नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी या महिलेने रात्री घडलेली हकीगत पतीला सांगितली व वारणेविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर वारणेला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.