मालाडच्या मालवणी येथील विषारी दारूकांडातील बळींची संख्या सोमवारी संध्याकाळ पर्यंत १०२ वर पोहोचली होती. अद्याप ४६ अत्यवस्थ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांचे छापासत्र सुरूच असून हातभट्टीची दारू विकणाऱ्यांवर तब्बल ४० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या महिला गुप्तहेरांचा प्रयोग यशस्वी होत असून, त्या आधारे छापासत्र सुरू करण्यात आले आहे.
मालवणीमधील विषारी दारूमधील बळींची संख्या सोमवारी १०२ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांत या विषारी दारू प्रकरणातील बाधितांवर उपचार सुरू असून त्यातील ४६ जण अद्याप अत्यवस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली असून ते दारू कुठून आणत होते, कशा पद्धतीने लपवून ठेवत होते त्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळत आहे. या भागात पोलिसांनी छापे घालून हातभट्टीची बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांविरोधात ४० गुन्हे दाखल केले असून २० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर ११ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.
दारूचे छुपे गुत्ते शोधून काढण्यासाठी परिमंडळ ११ मध्ये स्थानिक महिलांची मदत घेण्यात येत आहे. या महिलांना गुप्तहेर बनवून त्यांच्याकडूनच माहिती मिळवून कारवाई केली जात आहे. दारूच्या विरोधात पोलिसांनी गोरेगाव येथे छापा घातला, परंतु काही सापडले नव्हते. त्यानंतर या महिला गुप्तहेरांनी याच ठिकाणी लपवून ठेवलेल्या दारूबद्दल माहिती दिली. त्यानंतर पुन्हा छापा घातला असता लपवून ठेवलेल्या ४० लिटर दारूचा छापा आढळला, अशी माहिती देशमाने यांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ातही छापे
ठाणे: मालाड दारूकांडाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी गावठी दारूच्या गुत्त्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरात ठाणे आणि भिवंडी परिसरातील सात ठिकाणी कारवाई केली. यात गावठी दारूची विक्री करणाऱ्या सातजणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून  हातभट्टीची सुमारे ४० लिटर दारू जप्त करण्यात आली.

‘एमपीडीए’ कायद्यात सुधारणा
अवैध दारुनिर्मिती आणि विक्रीला पायबंद घालण्यासाठी गुन्हेगारांवर ‘महाराष्ट्र दहशतवादी कृत्ये प्रतिबंधक कायदा’ (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करता यावी, यासाठी त्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. अवैध दारूला आळा घालण्यासाठी कायदेशीर तरतुदी कडक नाहीत. त्यामुळे गुन्हेगार जामीनावर सुटतात.