मुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये तर, रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये झाले आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असुन, ३१ मे पर्यंत कार्डनुसार हे भाडं आकारता येणार असल्याचं परब म्हणाले आहेत. तसेच, मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सुरू असलेल्या दर वाढीमुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. मात्र भाडेवाढीने त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

भाडेवाढीच्या निर्णयासंदर्भात माहिती देताना अनिल परब म्हणाले, खटुआ समितीच्या शिफारशीनुसार एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.